जिन्सन जॉन्सन, महिला रीले संघाचे सोनेरी यश 

आशियाई क्रीडास्पर्धा : चित्रा उन्नीकृष्णन, सीमा पुनिया यांना कांस्य 
जकार्ता- युवा ऍथलीट जिन्सन जॉन्सनने पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत, तसेच भारतीय महिला संघाने 4 बाद 400 मीटर रीले शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई करताना आशियाई क्रीडास्पर्धेचा बारावा दिवस गाजविला. पुरुष रीले संघाने रौप्यपदक, चित्रा उन्नीकृष्णनने महिलांच्या 1500 मीटर शर्यतीत कांस्यपदक, तसेच अनुभवी सीमा पुनियाने महिलांच्या थाळीफेकीत कांस्यपदक जिंकताना भारतीय ऍथलीटची चमकदार कामगिरी कायम राखली. भारताने या स्पर्धेत 13 सुवर्णपदके पटकावली आहेत.

जिन्सन जॉन्सनने 3 मिनिटे 44.72 सेकंदांत अंतिम रेषा पार करताना सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. इराणच्या आमिर मोरादीने 3 मि. 45.62 सेकंदांत रौप्यपदक, तसेच बहरीनच्या मोहम्मद तियोवालीने 3 मि. 46.57 सेकंदांत कांस्यपदकाची कमाई केली. याआधी 800 मीटरमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा मनजित सिंग चौथ्या क्रमांकावर राहिला. त्याचे कांस्यपदक थोडक्‍यात हुकले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिलांच्या 4 बाय 400 मीटर शर्यतीत हिमा दास, एमआर पूवाम्मा, सरिताबेन गायकवाड व विस्मया कोरोथ यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने 3 मिनिटे 28.72 सेकंदांत अंतिम रेषा पार करताना सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. बहरीनच्या संघाने 3 मि. 30.61 सेकंदांत रौप्यपदक, तर व्हिएतनामने 3 मि. 33.23 सेकंदांत कांस्यपदकाची कमाई केली.

पुरुषांच्या 4 बाय 400 मीटर शर्यतीत कुन्हू मुहम्मद, धारून अय्यासामी, महंमद अनास व राजीव अरोकिया यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय पुरुष संघाने 3 मिनिटे 01.85 सेकंदांत रौप्यपदकाची कमाई केली. कतारच्या पुरुष संघाने 3 मि. 00.56व सेकंदांत सुवर्णपदक पटकावले. तर जपानने 3 मि. 01.94 सेकंदांत कांस्यपदकाची निश्‍चिती केली.

महिलांच्या 1500 मीटर शर्यतीत भारताच्या चित्रा उन्नीकृष्णनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. चित्राने 4 मिनिटे 12.56 सेकंद वेळ दिली. बहरीनच्या काल्किदान बेफकादूने 4 मि. 07.88 सेकंदांत सुवर्णपदक, तर बहरीनच्याच तिगिस्ट बेलेने 4 मि. 09.12 सेकंदांत कांस्यपदकाची निश्‍चिती केली. महिलांच्या थाळीफेकीत सुवर्णपदकाची अपेक्षा असलेल्या सीमा पुनियाला 62.26 मीटर अशा गेल्या सहा वर्षांतील सर्वोत्तम कामगिरीनंतरही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या चेन यांगने 65.12 मीटर फेक करीत सुवर्णपदक जिंकले. तर चीनच्याच फेंग बिनने 64.25 मीटर फेक करीत रौप्यपदकाची निश्‍चिती केली.

याआधी तेजिंदर पाल सिंगने शनिवारी गोळाफेकीत भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते. तसेच मनजित सिंगने 800 मीटर शर्यतीत, स्वप्ना बर्मनने महिलांच्या हेप्टॅथलॉनमध्ये, तसेच अर्पिंदर सिंगने पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारांत सुवर्णपदक पटकावले आहे. शिवाय अव्वल धावपटू द्युती चंदने महिलांच्या 100 व 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकांची कमाई करताना दुहेरी यशाची नोंद केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)