जिद्द…

श्रीकृष्ण केळकर 

जिद्द हा शब्द मनुष्यप्राण्याच्या जीवनकर्तृत्वाशी निगडीत आहे. आयुष्याच्या उमलत्या वयात हा शब्द तुम्हाला जिंकायची भावना देतो. जिद्दीने खेळा म्हणजे यश मिळेल हे खेळाचे मास्तर आपणाला सांगतात. मग हुतूतू, आटापाट्या, क्रिकेट, फुटबॉल या खेळात आपणाला विजय दिसतो. आपला हेतू साध्य करण्याकरता मनाची विशिष्ट्य अवस्था ठेवणे म्हणजे जिद्द. शालेय जीवनात खेळताना या शब्दाशी आणि पर्यायाने मनाच्या भावनेशी आपली ओळख होते. 

जिद्द हा मानवजातीला मिळालेला वर आहे. या वराने मानवजातीची अखंड प्रगती सुरू आहे. योग्य विचार, योग्य कल्पना घेऊन माणूस निरनिराळी स्वप्ने पाहातो. कोलंबंस, वास्को द गामा, एडिसन, आईन्स्टाईन हे सगळे एका ध्येयाने पछाडलेले लोक होते. अफाट परिश्रम आणि जिद्द याच्या जोरावर त्यांनी असाध्य गोष्टी साध्य केल्या आणि मानवजात प्रगतीपथावर नेली. हे लोक मानवजातीच्या कल्याणाकरता जिद्दीने उभे राहिले.

ज्यू समाजाची जिद्द जगजाहीर आहे. त्यांनी अनंत हालअपेष्टा आणि अनंत यातना भोगल्या. त्यांना स्वत:चा देश नव्हता, तेव्हासुद्धा एकमेकांचा निरोप घेताना, पुढच्या वेळेस आपल्या देशात भेटू असे म्हणायचे. 1948 साली ज्यू लोकांचे राष्ट्र निर्माण झाले. वाळवंटात त्यांनी शेती फुलवली, बागा केल्या आणि देशही राखला. एक-दोन वर्षे नाही, तर पिढ्यान्‌पिढ्या त्यांनी कष्ट केले. त्यांचेवर झालेल्या अत्याचाराचा अत्यंत कडवा प्रतिकार केला. अजूनही करत आहेत. न कंटाळता, न थांबता अफाट कष्ट करत आहेत. कशाच्या जोरावर? तर जिद्द.

जिद्द कधीही हार मानत नाही. ती आपल्याला आपले जीवन संपवू देत नाही. हताश होऊ देत नाही. विरंगुळ्याचे क्षण नाहीत म्हणून तक्रार करत नाही. ठरवलेले लक्ष्य साधेस्तोवर ती माणसाला कार्यमग्न ठेवते. जिद्दीपायी आयुष्य संपते. स्वातंत्र्य मिळावे हया जिद्दीपायी वासुदेव फडके, भगतसिंगसारखे लोक फासावर गेले. सावरकरांनी दोन जन्मठेपेच्या शिक्षा भोगल्या. ती जिद्द पुढील समाजात उतरली. जिद्द अमर आहे.

नियती ही लहरी आणि अतिशय ताकदवान असते. माणसाचे नशीब ती ठरवते. शाहू तलावावर फार पूर्वीपासून एक मुलगा नियमित पोहायला येतो. नीलय त्याचे नाव! नीलयला परमेश्‍वराने सुंदर शरीर बहाल केले, बुद्धी दिली पण… हातापायाची देणगी दिली नाही. ती वाढ अपुरी ठेवली. तो व्हीलचेअरवर येतो. त्याला घेऊन येणारा त्याचा इमानी सेवक त्याला आधार देऊन हळूच पाण्यात सोडतो आणि मग नीलय पोहण्याचा आनंद मनमुराद लुटतो. पोहल्यावर सेवक त्याला व्हीलचेअरवर घेतो. कोरडे करून कपडे घालतो. तो हसतमुखाने बाहेर पडतो. मी त्याची अफाट जिद्द पाहून भारावून जातो.

परमेश्‍वराने त्याला हे जग दाखवले, पण या जगातली अगदी साध्यातली साधी गोष्टसुद्धा उपभोगायची संधी त्याला दिली नाही. पण या गोष्टीचा यत्किंचितही बाऊ न करता प्रसन्न चेहऱ्याने तो टॅंकवर असतो. व्हीलचेअर हेच त्याचं जग आहे. आलेला प्रत्येक दिवस पाहणे पण तो उपभोगायला न मिळणे हेच त्याचे जीवन आहे. पण असंही जीवन तो एका प्रचंड ताकदीने, जिद्दीने, हताश न होता, हसतमुखाने तो जगतो आहे. आमच्यासारख्या धडधाकट माणसांनीही त्याचेपासून शिकावे.

सदृढ असे मन आणि विचारशक्‍ती त्याला आहे. पण त्याला कोणतीही स्वप्ने प्रत्यक्षात आणणे अशक्‍य आहे. तो त्याचा रोजचा दिवस जिद्दीने पार पाडतो. त्याचे दुर्दैवाचे भांडवल करत नाही.
काही मुले परीक्षा अवघड गेली, अपयश आले प्रेम प्रकरण फसले म्हणून आत्महत्याही करतात. स्वत:चे आयुष्य घडवण्याऐवजी संपवण्याकरता जिद्दीचा वापर करणाऱ्या हया मुलांबद्दल कणव वाटते.
एक मुलगीही टॅंकवर येते. तिला व्हीलचेअर लागत नाही. तिलाही जीवनाचा त्रास सौम्य, पण तसाच आहे. तीही पोहते. दोघेही पोहताना सर्वजण त्यांना चटचट जागा करून देतात. आपण त्यांच्या पोहण्याच्या आड येणार नाही याकडे जागरूकतेने लक्ष देतात. कोणीही त्यांना खोटी सहानुभूती दाखवत नाहीत. आमचे सदाबहार पाटील नीलयची छान फिरकी घेतात. त्याला तू आमच्यातलाच आहेस ही सुखद जाणीव देतात. या मुलांच्या जिद्दीला माझा सलाम.
रात्री देवापुढे निरांजन लावून प्रार्थना म्हणताना मी देवाला विनवतो की, हया मुलांसारखे आयुष्य कोणालाच देऊ नकोस. या पार्श्‍वभूमीवर सफर सिनेमातले जिंदगी का सफर। है ये कैसा सफर। कोई समझा नहीं कोई जाना नहीं।। हे गाणे उदास करते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)