जिद्दीने स्वप्नपूर्ती करणारा वीरपुत्र

मित्र आमच्यात नाही, हा विचारही सहन होण्यापलीकडचा
 
पुणे – वयाच्या दहाव्या वर्षीच सैन्यात जाण्याची जिद्द बाळगून मेजर शशीधरन नायर यांनी त्यासाठी प्रयत्न केले. प्रसंगी खडकवासला ते सेनापती बापट रस्ता असा सायकलने प्रवास करत एनसीसीसाठी ते येत असत. केवळ स्वत:पुरता विचार न करता आपल्या मित्रांचीदेखील प्रगती कशी होईल, यासाठी नेहमीच दक्ष असणारे मेजर नायर आज आमच्यात नाही, हा विचारही सहन होण्यापलीकडचा आहे. अशा भावना त्यांच्या मित्रपरिवाराने व्यक्त केल्या.

मेजर नायर यांना शनिवारी पुण्यातील राष्ट्रीय युद्धस्मारक येथे लष्करी परंपरेने मानवंदना देण्यात आली. मानाचा “गार्ड ऑफ ऑनर’ देऊन नायर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी दक्षिण मुख्यालयाचे मेजर जनरल एन. एस. लांबा उपस्थित होते. मेजर नायर यांच्या पत्नी तृप्ती यांना मणक्‍याचा आजार असून, त्यांच्यावर खडकी येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी उपस्थित त्यांच्या मित्रपरिवाराने मेजर नायर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

“मेजर नायर आणि मी कॉलेजपासूनचे मित्र आहोत. अभ्यास, विविध कार्यक्रम, एनसीसी इतकेच नव्हे तर देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये देखील आम्ही एकत्र होतो. मात्र, अकॅडमीतील तिसऱ्या वर्षाच्या प्रशिक्षणात मला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे मला सैन्यात दाखल होता आले नाही. याबाबत मेजर नायर यांना खूप वाईट वाटले होते. त्यावेळी मला माझ्या नैराश्‍यातून त्यानेच बाहेर काढले होते. जेव्हा जेव्हा तो सुट्टीसाठी घरी येत तेव्हा न चूकता सगळ्यांना भेटायचा.’
– मकरंद पिसाळ, मेजर नायर यांचे मित्र

“मेजर नायर यांना पहिल्यापासूनच सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. त्यासाठी ते नेहमीच धडपडायचे. शारीरिक प्रशिक्षण असो, की महाविद्यालयीन शिक्षण सगळ्यांतच तो नेहमी पुढे असायचा. एनडीएत प्रवेश घेण्याची त्याची खूप इच्छा होती. त्यासाठी बराच प्रयत्नही केला; पण त्यात त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे खचून न जाता जिद्दीने त्याने सीडीएस परीक्षेची तयारी केली. त्यात यश मिळविले आणि सैन्यात भरतीदेखील झाला.
– बाळू सोनटक्‍के, मेजर नायर यांचे मित्र

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)