जितेंद्र आव्हाड यांचे आरोप सूडबुद्धीने

नगरसेवक धीरज घाटे यांची सायबर क्राइमकडे तक्रार

पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंधुरे याचे पुण्यातील भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला असून, त्यांच्याविरोधात घाटे यांनी सायबर क्राइम आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अंधुरे याला दाभोलकर खूनप्रकरणात अटक झाली आहे. अंधुरे याने याआधी फेसबुकवर आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात खालच्या पातळीवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. या अटकेनंतर आव्हाड यांनीही सोशल मीडियावर हिंदुत्त्ववाद्यांवर जोरदार टीका सुरू केली आहे. त्यातूनच त्यांनी तीन वर्षांपूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत त्यामध्ये घाटे यांच्याबरोबर अंधुरे उपस्थित होता, असा ट्‌विटरद्वारे आरोप केला आहे.

आव्हाड यांचा आरोप खोटा असल्याचा खुलासा घाटे यांनी केला आहे. तसेच आव्हाड यांच्या विरोधात सायबर क्राईम आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आव्हाड यांच्यावर झालेल्या तथाकथित हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नाही. या प्रकरणात आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच सचिन अंधुरे याला आपण ओळखतही नाही आणि कधी भेटलोही नाही, असे तक्रार अर्जात म्हटले आहे.

आव्हाड यांनी माझ्यावर राजकीय सुडातून खोटे आरोप केले आहेत. या आरोपामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. आव्हाड यांनी घेतलेल्या भूमिकेवर मी वेळोवेळी ब्लॉग लिहिले आहेत. त्याचा राग मनात धरून आव्हाड यांनी हे बिनबुडाचे आरोप केले आहेत, असे घाटे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. त्यामुळे या आरोपांची दखल घेऊन कारवाई करावी, अशी विनंती अर्जाद्वारे करण्यात आली आहे. तसेच आव्हाड यांच्या या वक्‍तव्याबाबत त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावाही दाखल करणार असल्याचे घाटे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)