जिजामाता उद्यानाला राजकीय “खो’?

पिंपरी – पिंपळे गुरव मधील डायनोसॉर उद्यान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजामाता उद्यानाचा दहा वर्षांच्या आतच नुतनीकरणाचा घाट घालण्यात आला; मात्र मुदत उलटूनही काम अपुर्णावस्थेत आहे. भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वादामुळे या कामाचे त्रांगडे झाले आहे. साडेचार कोटींची तरतूद असलेल्या या उद्यानाच्या कामावरील खर्चात दहा कोटींपर्यंत वाढ झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथे 2006मध्ये दोन कोटी रुपये खर्च करून हे उद्यान उभारण्यात आले. जॉगिंग ट्रॅक, दाट झाडी, आकर्षक कारंजे व विस्तीर्ण परिसरात डायनोसॉरची प्रतिकृती हे या उद्यानाचे आकर्षण होते. भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) या कंपनीकडे सुरुवातीला उद्यानाच्या देखभालीचे काम होते. हजारो नागरिकांचा वावर असणाऱ्या या उद्यानाचे नंतर पालिकेच्या उद्यान विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले. 2015मध्ये या उद्यानाच्या नुतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. दुबईतील मिरॅकल उद्यानाच्या धर्तीवर नुतनीकरणांतर्गत सुशोभिकरण करण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार, महापालिकेने या नुतनीकरणासाठी 4 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद केली. 2016 मध्ये प्रत्यक्षात नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. एम. एस. साठे यांची कंत्राटदार म्हणून या कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे. वर्षभराची मुदत या कामासाठी होती; मात्र दीड वर्षे उलटूनही काम अर्धवट स्थितीमध्ये आहे.

वास्तविकतः या उद्यानाची उभारणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ता काळात झाली. पिंपळे गुरव हा आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हे उद्यान देखील त्यांच्या निवासस्थानासमोरच आहे. त्यांच्याच संकल्पनेतून उद्यानाची उभारणी आणि नुतनीकरणाचा निर्णय झाला. एकेकाळी त्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या तत्कालीन महापौर शकुंतला धराडे व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या पाठपुराव्यातून हे काम सुरू झाले. मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार जगताप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शेकापसोबत घरोबा केला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला.

महापालिका निवडणुकीत सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आली. या सत्तांतराचे शिल्पकार आमदार जगताप ठरले. या राजकीय उलथा-पालथीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेससह माजी महापौर शकुंतला धराडे व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यात वितुष्ट ओढावले. तेथून अडवा व जिरवा धोरणाला सुरुवात झाली. या उद्यानातील प्रशस्त जॉगिंग ट्रॅक व ध्यान केंद्रामुळे व्यायामासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. मात्र, दोन वर्षांपासून उद्यान बंद असल्याने नागरिक उद्यानाबाहेर रस्त्यावर व्यायाम करताना सकाळी दिसून येतात. उद्यानात नियमित येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झाला असून महापालिकेच्या उद्यान विभागाला दरमहा मिळणारे हजारोंचे उत्पादन बुडत आहे. उद्यानाच्या कामाला गती देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

साडेचार कोटींचे काम दहा कोटींवर
राजकीय वादंगातून नुतनीकरणाच्या कामात अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे एकीकडे काम पूर्ण करण्यास विलंब होत असतानाच दुसरीकडे कामावरील खर्चाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहे. या संपूर्ण कामासाठी सुरुवातीला साडेचार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती; मात्र टप्पा एक व दोन असा शब्दखेळ करत दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी पाच कोटींच्या वाढीव खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे काम आता दहा कोटींच्या घरात पोहचले आहे.

उद्यानाच्या नुतनीकरणाच्या कामाची वैशिष्टये
– व्हर्टिकल गार्डन
– चार प्रवेशद्वार थ्रीडी गेट
– एव्हेंजर वॉल, फ्रील,
– चंद्रकोर आकारात 42 बाय 14 आकाराचे कारंजे
– हरी वॉटर हाऊस, फ्लावर लेक,
– विविध रंगी फुलांच्या बागा

महापालिकेत भाजप सत्तेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येक विकास प्रकल्पाला खोडा घालण्याचे काम सुरु आहे. जिजामाता उद्यानाच्या नुतनीकरणाच्या कामाचा खेळखंडोबा झाला आहे. काम पूर्ण करण्यास विलंब होत असल्याने त्यावरील खर्चात वाढ होत आहे. महापालिकेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असतानाच नागरिकांमधूनही संताप व्यक्त होत आहे. जॉगिंग ट्रॅक नसल्याने नागरिक रस्त्यावरच धावतात. त्यातून अपघात होत आहेत. उद्यानाचे काम रेंगाळत ठेवून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते पुर्णत्वाला आणून त्याचे श्रेय लाटण्याचा भाजपचा डाव आहे.
– राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक.

जिजामाता उद्यानाचे नुतनीकरण दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामाला तांत्रिक मान्यता मिळाली असून लवकरच निविदा प्रसिद्ध होत आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने कामास विलंब होत आहे. पाथवे, ग्राऊंड लेव्हलिंग, व्हर्टीकल म्युरल्स, लॉन, वृक्ष लागवडीचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक अशा पद्धतीचे हे उद्यान असणार आहे. त्यात कोणतीही त्रुटी राहू नये याची दक्षता घेतली जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील निविदेला मंजुरी मिळताच सहा महिन्यांच्या आत उद्यान नागरिकांसाठी खुले होईल.
– संजय कांबळे, कार्यकारी अभियंता, महापालिका.

जिजामाता उद्यानाच्या पहिल्या टप्प्याचे काम 85 टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाले आहे. सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चाचा पहिला टप्पा होता. आता दुसऱ्या टप्प्यासाठी पाच कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी निविदा प्रसिध्द करण्यात येत असून आयुक्तांकडे स्वाक्षरीसाठी फाईल गेली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत उद्यानासाठी वाहनतळ व शेजारी बस टर्मिनल विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे काही तांत्रिक बाबींमुळे कामाला विलंब होत असला तरी सहा महिन्यांत नागरिकांसाठी हे उद्यान खुले होईल. या उद्यानामुळे पिंपळे गुरव आणि शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे.
– सागर आंगोळकर, नगरसेवक भाजप.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)