जिओच्या खोदकामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार?

तळेगाव-दाभाडे – रिलायन्स जिओ ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप तळेगाव-दाभाडे नगर परिषदेच्या नियोजन समिती सभापतींनी केला आहे. सभापती अमोल शेटे यांनी या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करुरून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

नागरिकांना वेगळा न्याय व कंपनीला वेगळा न्याय असा प्रकार नगर परिषदेत होत आहे. जिओच्या केबल टाकण्याच्या प्रक्रियेत 1 कोटी, 94 लाख, 84 हजार 800 रुपयांचे नगर परिषदेला नुकसान झाले आहे. नगर परिषदेची विकास कामे या खोदकामामुळे उद्‌ध्वस्त होत असल्याने नागरिकांमध्ये चीड आहे. नगर परिषद हद्दीत रिलायन्स जिओ ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी सन्‌‌‌ 2016-17 मध्ये अंदाज पत्रकात केबल भुईभाडे प्रती रनिंग मीटर 2,500 रुपये, तर खोदाई रक्‍कम प्रती रनिंग मीटर डांबरी रस्ता 2,500 रुपये, माती रस्ता 300 रुपये व डब्ल्यू, बी, एम 500 रुपये असा दर मार्च 2016 ला ठरला होता.

2017 -18 च्या अंदाज पत्रकात केबल भुईभाडे प्रती रनिंग मीटर 3,500 रुपये, खोदाई प्रती रनिंग मीटर डांबरी रस्ता 2,500 रुपये, माती रस्ता 300 रुपये व डब्ल्यू, बी, एम 500 रुपये असा दर मार्च 2017 मध्ये ठरला असताना दि.23 जनू 2017 रोजी नगर परिषदेने 2016-17 च्या अंदाज पत्रकप्रमाणे कमी दराने व कमी रक्कम भरून घेतली. नगर परिषदेचे जवळजवळ 2 कोटी रुपयांचे नुकसान व तेवढ्याच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नियोजन समिती सभापती अमोल शेटे यांनी केला आहे.

कंपनीला अमानत रक्‍कम परत का करायची?
नगर परिषद हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या वैयक्‍तीक कामासाठी जर रस्ता खोदाई करायची असेल, तर प्रती रनिंग मीटर 2,500 रुपये घेतले जातात. विनापरवाना रस्ता खोदाई केल्यास विहित केलेल्या शुल्काच्या दुप्पट आकारणी केली जाते. ती रक्कम त्यांना कधीच परत केली जात नाही. खोदाई केलेल्या रस्त्याची दुरुस्ती नगर परिषद करत असते. अनामत रक्कम 1 कोटी, 23 लाख, 14 हजार, 800 रुपये अनामत रक्कम रिलायन्स जिओला परत का करणार? नागरिकांना वेगळा न्याय व कंपनीला वेगळा न्याय, असा प्रकार नगर परिषदेत सुरू आहे.

भुईभाडे 2 कोटी, 50 लाख, 95 हजार रुपये, खोदाई 1 कोटी, 23 लाख, 14 हजार, 800 रुपये असून एकूण 3 कोटी, 74 लाख, 9800 रुपये होतात. यापैकी 1 कोटी, 94 लाख, 84 हजार 800 रुपयांचे नगर परिषदेला नुकसान झाले आहे.

सुस्थितील रस्ते खोदले जात असून बीएसएनएल केबल, पाण्याचे नळ जोडणी, तसेच सांडपाण्याची गटारे तोडली जात आहे. हा खर्च नागरिकांच्या खिशातून केला जात आहे. या खोदाईत वृक्षांच्या खोडांना तसेच मुळांना इजा झाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. रिलायन्स जिओ केबल टाकण्याचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. खोदाईत रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे पडले असून अपघाताला कारण बनत आहे. नगर परिषदेचे नुकसान करून नागरीक व कंपनीत भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नियोजन समिती सभापती अमोल शेटे यांनी केली.

नगर परिषद मुख्याधिकारी वैभव आवारे म्हणाले, रिलायन्स जिओ कंपनीचे केबल टाकण्याचे काम नियमानुसार सुरू आहे. यात कसलाही भ्रष्टाचार नाही. खोदाई करताना नुकसान झालेले रस्ते, गटार, नळ जोडणी आदी कामे त्वरित केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)