जिंतीत अज्ञात रोगाने पशुधन धोक्‍यात; ग्रामस्थ संतप्त

कराड – जिंती ता. कराड येथे अज्ञात रोगाने चार महिन्यात तब्बल 44 म्हैशी दगावल्या असून यामध्ये दुभत्या जनवरांचा अधिक समावेश आहे. अज्ञात रोगामुळे पशुधन धोक्‍यात आल्याने येथील ग्रामस्थ हादरून गेले आहेत. जिंती येथे आत्तापर्यत या आजाराने 44 पेक्षा अधिक जनावरे दगावली आहेत. याबाबतची लेखी तक्रार ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, आनंदराव लामणे यांनी पशुधन विस्तार अधिकारी संजय पवार यांच्याकडे गत आठवड्यात केली होती.

यावेळी जनावरांना ताप येवून एक दोन दिवसातच ती दगावत असल्याची माहिती त्यांना दिली होती. त्यावर पवार यांनी अशी लक्षणे आढळल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी केले होते. याप्रसंगी तानाजी मारुती पाटील यांच्या म्हैशीला अशी लक्षणे असल्याची माहिती संबधित अधिकाऱ्यांना दिली होती. गुरुवारी रात्री ती म्हैस दगावल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. वेळीच उपचार न मिळाल्याने म्हैस मृत्यमुखी पडल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केल्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे पथक शुक्रवारी सकाळी दाखल झाले होते. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आक्रमक झालेल्या शेतकऱ्याच्या भावना पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. पोलीस पाटील संतोष पाटील, राजेंद्र पाटील यांनी मध्यस्थी करत तुमच्या विभागाने दुर्लक्ष केल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तातडीने गावात जनावरांचे शिबिर आयोजित करून तपासणी व लसीकरण करण्याची मागणी केली.

यावर अधिकाऱ्यांनीही तातडीने शिबीर घेण्याची ग्वाही देवून सदर म्हैशीचे शवविच्छेदन करून पुढील तपासणीसाठी पुणे येथील लॅबला पाठविण्यात येणार असल्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिली.कराडचे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अंकुश परिहार, पशुधन विस्तार अधिकारी संजय पवार, पशुधन विकास अधिकारी व्ही. टी. पाटील, पशुधन अधिकारी सय्यद, उपसरपंच अशोक पाटील, संभाजी पाटील, दत्तात्रय पाटील, विलास पाटील, वसंत पाटील, रघुनाथ पाटील, संजय पाटील, शिवाजी पाटील, परशुराम पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)