जास्त प्रचार आणि कमी विचार हाच मोदींचा मंत्र-जयराम रमेश

सर्वच आघाड्यांवर केंद्र सरकारला अपयश आल्याचे टीकास्त्र

अहमदाबाद –आर्थिक, कृषि, ग्रामीण विकास आणि रोजगार निर्मिती अशा सर्वच आघाड्यांवर केंद्र सरकारला तीन वर्षांत अपयश आले आहे. जास्त प्रचार आणि कमी विचार हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र आहे, असे जोरदार टीकास्त्र आज माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोडले.
मोदी सरकारच्या कार्यकाळाला 26 मे यादिवशी तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. त्याचा संदर्भ देत रमेश यांनी येथे पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारच्या कामगिरीची चिरफाड केली. मोदींनी दिलेली आश्‍वासने आणि त्यांची पूर्तता यांमध्ये प्रचंड अंतर आहे. त्यांनी दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करण्याचे आश्‍वासन दिले. प्रत्यक्षात 2016 मध्ये केवळ 2 लाख तर आधीच्या वर्षी (2015) त्यापेक्षाही कमी म्हणजे दीड लाख लोकांना रोजगार मिळाला. गुंतवणूक कमी झाल्याने तसे घडले, असे ते म्हणाले. गहू आणि डाळींची आयात करण्याच्या मोदी सरकारच्या धोरणावरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.
पुढे बोलताना रमेश यांनी नोटाबंदीमुळे किती काळा पैसा उघड झाला, असा सवाल मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना उद्देशून विचारला. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील मागील यूपीए सरकारच्या योजनांची नावे बदलण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला आहे. जनधन योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना त्याचीच उदाहरणे आहेत. मोदी हे नाव बदलून जुन्या योजना नव्या असल्याचे भासवणारे मास्टर पॅकेजर आहेत, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)