जावळी पंचायत समितीच्या सभापतीपदी जयश्री गिरी यांची निवड

कुडाळ – जावळी पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या पंचायत समिती सभापती पदावर प्रथम म्हसवे गणाच्या सदस्या अरुणा शिर्के यांना संधी देण्यात आली होती. तर त्यांच्या राजीनाम्यानंतर बुधवारी झालेल्या सभापती निवडीत सायगाव गणाच्या सदस्या सौ. जयश्री सुहास गिरी यांची एकमताने उर्वरित कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. बुधवारी यासाठी निवडणूक कार्यक्रम पार पडला. जयश्री गिरी यांच्या निवडीमुळे पतीनंतर पत्नी सभापती होऊन जावळीच्या राजकीय इतिहासात गिरी दांपत्याने इतिहास घडवला आहे.

बुधवार, दि.9 रोजी सभापती निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी विशेष सभा बोलावली होती.यावेळी जयश्री गिरी यांचाच एकमेव अर्ज सभापतीपदासाठी दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली. त्यानंतर गिरी समर्थकांनी एकच जल्लोष केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सदस्या अरुणा शिर्के व जयश्री गिरी यांना सव्वा सव्वा वर्षांसाठी सभापतीपद दिले जाईल अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी निवडणुकीनंतर दिली होती. त्यानुसार दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अरुणा शिर्के यांचा 4 डिसेंबरलाच राजीनामा घेण्यात आला होता. त्यानुसार जयश्री गिरी यांना उर्वरित कालावधीसाठी सभापतीपदाची पक्षनेत्यांनी संधी देऊन आगामी निवडणुकांची समीकरणे जुळवली आहेत.

यावेळी निवडीनंतर झालेल्या सभेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाती पातीच्या राजकारणाला थारा दिला जात नाही, राष्ट्रवादी पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून या पक्षात जातीय राजकारण केले जात नाही. छत्रपतींच्या काळातही शिवरायांनी सर्वांना समानतेची वागणूक देत, सर्व समाजाला एकत्रित घेऊन स्वराज्याची बांधणी केली होती. त्याच पावलावर पाऊल ठेऊन त्यांचेच वंशज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सर्व समाजाला एकत्र करून त्यांची राजकीय वाटचाल सूरू ठेवली आहे.

सौ. जयश्री गिरी यांची सभापतीपदी निवड करून आमदार भोसले यांनी सर्वधर्म समानतेचा वसा कायम ठेवला आहे. तसेच जाती पातीपेक्षाही कर्तृत्वान व्यक्तीला संधी आमच्या पक्षात दिली जाते हे आज यानिवडीद्वारे पक्षाने दाखवून दिले आहे.असेही त्यांनी नमूद केले. तर जयश्री गिरी म्हणाल्या, मिळालेल्या संधीच सोनं करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच पक्षनेत्यांनी दाखवलेला विश्‍वास सार्थ करणार आहे, आपल्या कार्यकाळात सर्वांना बरोबर घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही गिरी यांनी यावेळी दिली.

पतीनंतर पत्नीची निवड

जयश्री गिरी यांचे पती सुहास गिरी यांनी 2014 ते 2016 सभापती पद भूषवले होते.तर आता त्यांच्याच पत्नी जयश्री गिरी यांना सभापती पदाची संधी मिळाली आहे.त्यामुळे जावळी सभापतीपदावर पती नंतर पत्नी विराजमान होऊन गिरी दाम्पत्यांनी जावळीच्या राजकीय इतिहासात एक वेगळा इतिहास घडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)