जावलीत भाकरी करपण्याचे संकेत

आ. शिवेंद्रसिंहराजे योग्य निर्णय घेतील असा कार्यकर्त्याना विश्‍वास
सातारा, दि.30 प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावली तालुक्‍यात अनेक जातीधर्माच्या मावळ्यांनी शिवरायांना साथ दिली. या उलट, चंदरराव मोरे यांनी केलेल्या गद्दारीने या भागाला गालबोट लागले. हा इतिहास असतानाही सध्या जातीपातीच्या राजकारणातून आपले नसलेले अस्तित्व टिकविण्याची सुपारी काही महाभाग देत आहेत. त्यामुळे जावलीच्या नेत्यांना आता जावली पंचायत समितीमध्ये भाकरी पलटी केली नाही तर करपणारच, याची काणकूण लागलेली आहे. याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे योग्य निर्णय घेवून समतेचा नारा देतील, असा विश्वास जावली तालुक्‍यातील राजकीय अभ्यासक व्यक्त करीत आहेत. उद्या रविवारी जावलीकर कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी गंभीरपणे चर्चा करणार असल्याचे राष्ट्रवादी गोटातून सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे या त्रिमूर्तींच्या सल्ल्याने जावली तालुक्‍यातील राजकीय झंझावात सुरु आहे. हाच झंझावात रोखण्याचे काम भाजपचे दीपक पवार, अमित कदम, शिवसेनेचे प्रशांत तरडे, विश्वनाथ धनावडे आपल्या ताकदीनुसार करीत आहेत. पूर्वी शिवसेनेची सत्ता असताना जावली भगवीमय झाली होती. पण आता झेंडा आणि काठी दुसर्या पक्षात गेल्यामुळे राजकीय वाटचाल बिकट आहे. त्याचा पुरेपूर फायदा राष्ट्रवादीला होत आहे. 6 पंचायत समिती सदस्य असलेल्या जावलीमध्ये वादग्रस्त पदाधिकार्यांचे कारनामे काहींनी पुढे आणले. हा भाऊबंदकीचा वाद असला तरी अशा पदावर काम करणारांनी वाद मिटवणे गरजेचे होते. पण सध्या पंचायत समितीच्या पदाधिकार्यांची खांदेपालट केली जाणार आहे. यासाठी नेते अनुकूल बनल्यानंतर काहींनी जात पुढे केली आहे. मुळात जात नाही ती जात असली तरी जावलीमध्ये पोटातून जातीयवाद आणि मुखातून निधर्मीवाद नेहमीच घडत आहे. त्याला फक्त राजकारणच अपवाद नाही. कारण यापूर्वी सभापती पदाचा राजीनामा देण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. त्याची कधीही वाच्यता झाली नाही. आता मात्र आभाळ कोसळणार आहे, जावलीचा विनाश होणार आहे, अशा अविर्भावात काहींनी आवया उठवल्या आहेत. खरे म्हणजे सर्व जातींना समान संधी मिळावी, हा राष्ट्रवादीच्या विचारांचा गाभा आहे. त्याला सुरुंग लावण्याचे काम राष्ट्रवादीतूनच होत असल्यामुळे अनेक मातब्बरांनी राष्ट्रवादीला जय जावली करुन भाजपची सावली स्विकारली आहे.
चौकट
पुरोगामी विचारांच्या जावलीकरांनी कधीही जातीपातीला थारा दिला नाही. पण काही भागातील सहकारी संस्थेमध्ये प्राबल्य असणारी मंडळी संकुचित विचाराने राष्ट्रवादीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. कुडाळ गटात राष्ट्रवादीचे ऋषिकांत शिंदे यांचा झालेला पराभव हा कोणी जात समोर ठेवून केलेला नव्हता. तसेच दीपक पवार यांना जात बघून मते मिळाली नव्हती. याचा विसर काहींना पडला असला तरी सध्या अर्थकारण महत्त्वाचे मानले जात आहे. जिसके पास पैसा, उसको सब पुछे हाल कैसा याचीही प्रचिती येथे येत आहे. जावली पंचायतीमध्ये पदाधिकार्यांच्या बदलाची भाकरी पलटीच करावी लागणार आहे. कारण त्यांना संधी दिली, पण त्याचा फायदा राष्ट्रवादीला होवू शकला नाही, हे आता नेत्यांनासुद्धा पटले आहे. त्यामुळे आता जातीपातीच्या राजकारणाला बगल देवून नेत्यांनासुद्धा निधर्मीवाद मनापासून स्विकारावा लागणार आहे. अन्यथा जावलीतील मतदार हे जागृत आहेत. त्यांनी जर आपल्या जातीचा उमेदवार नाही म्हणून नोटाला मते दिल्यास दृष्टिक्षेपात दिसणारा विजय दृष्टीआड झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही, अशी स्थिती होवू शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)