जाळलेले झाड गेले कुठे?

सातारा नगरपरिषदेचा वृक्षविभागच झाला रुक्ष

गुरूनाथ जाधव

सातारा – सातारा शहरातील पारंगे चौकात जाळलेले झाड गेले कुठे असा सवाल विचारण्याची वेळ आज सातारकरांना आली आहे. जाळलेले झाड सांगतेय आपली करून कहाणी याबाबतचे वृत्त दैनिक प्रभातने प्रसिद्ध केले होते. सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात देखील झाडं जाळून मारण्याचा प्रकार सुरू असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले होते. आता या जागेवरील जाळलेल्या झाडाचे उरलेले अवशेष कोणत्या वखारीत तर पाठवले नाहीना असा संशय वृक्षमित्रांनी व्यक्त केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संबधित पारंगे चौकातील झाड सातारा नगरपरिषदेच्या वृक्षविभागाच्या अधिपत्याखाली येते. या जाळलेल्या झाडाबद्दल खात्रीने सातारा नगरपरिषदेच्या वृक्षप्राधिकरण विभागाला माहिती नाही का असाही प्रश्‍न विचारला जात आहे.
विनापरवाना वृक्ष तोडीचे दिवसेंदिवस वाढत असलेले प्रमाण ही कायद्याचा अवमान करणारी बाब आहे. काही अधिकारीच याला खतपाणी घालत असल्याने वृक्ष प्राधिकरण समिती रूक्ष झाल्याने सातारच्या सौंदर्याला गालबोट लागत आहे.

या वृक्षांच्या कत्तली होत असताना पर्यावरण प्रेमी संस्था, वृक्ष मित्र यांच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती दिल्यानंतर देखील संबधित विभागाकडून कोणत्याही प्रकारचे सकारात्मक काम होत नसल्याचे आजवर दिसले आहे. राजवाडा गोलबागेसमोर जाहिरातींच्या बॅनर खाली कित्येक वृक्षांना आपला जीव गुदमरून जगावे लागत आहे. शहरातील विविध भागांमध्ये सर्रास वृक्ष तोड केली जात असताना. त्याच्या परवानग्या प्रत्यक्ष जागेवर जावून शहानिशा देखील करण्याचे काम संबधित विभाग करत नसल्याचे अनेक वेळा दिसले आहे.

वृक्ष समितीवरील सदस्य हे फक्त नामधारी असून त्यांनी वृक्षारोपणाबरोबर वृक्षसंवर्धनाचे मोलाचे काम करणे यानिमित्ताने आवश्‍यक बनले आहे. सातारा नगरपरिषदेत झालेल्या वृक्ष समितीच्या बैठकीत आरटीओ कार्यालयातील वृक्ष तोडीची मोठी चर्चा रंगली. फक्त स्टंट बाजी अथवा तोंडाला काळे फासण्याच्या प्रयत्नांनी काय होणार. मुळात शहरातील वृक्ष संवर्धनासाठी आजवर कोणी काय केले ते सांगण्याची गरज आहे. शहरात किती झाडे लावली ? हे आकडे सांगताना किती जगवली यांचे देखील आकडे सांगण्याचे काम वृक्ष समिती व सदस्य करतील अशी माफक आशा आहे.

सातारा शहराच्या सौदर्यामध्ये भर टाकणाऱ्या वृक्षांची विनापरवाना तोड होत असताना वृक्षलागवडीबरोबर त्याचे सवंर्धन करण्याचे महत्व लक्षात घेतले पाहिजे. यासाठी वृक्ष मित्रांनी वृक्ष संवर्धन चळवळ सुरू केल्यास वृक्ष जाळणे, किंवा तोडण्याच्या निंदनीय कृत्यांना आळा बसेल. यासाठी महाविद्यालय, शाळांनी आपापल्या परिसरातील झाडे दत्तक घेवुन त्यांचे संगोपनाची जबाबदारी घेऊन वृक्षसंवर्धनाचा नवा संकल्प करावा. यासाठी नगरपरिषदांनी तसेच जिल्हा परिषद व वनविभागाने मोलाचे सहकार्य देणे आवश्‍यक आहे.

नगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातील बेजाबदार आधिकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकावे. प्रत्येकवेळी वृक्ष तोडीचे विषय सभेत येतात मात्र वृक्षलागवडीचे विषय येत नाहीत. गेल्या 2 वर्षात जेवढी पण वृक्ष तोड झाली, त्यामध्ये त्रिसदस्यीय समितीला विश्‍वासातच घेतले नाही. या समितीमधील एका पण सदस्याला एकदा सुद्धा प्रत्यक्ष पाहणी अहवालासाठी बोलवलेच नाही. संबधित आधिकारी यांचा पारदर्शक कारभार असता तर त्रिसदस्यीय समितीला बोलावून प्रत्यक्ष अहवाल घेतले असते. पण तसे कधीच केले नसल्याने यामध्ये पारदर्शकता नसुन आधिकाऱ्यांचा मनमानी व भोंगळ कारभार सुरू आहे असे स्पष्ट दिसते.
– संतोष (सनी) शिंदे, वृक्ष समिती सदस्य


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)