जायकवाडी प्रकल्पाकडेचा परिसर बनलाय ऊस शेतीचे आगर….(भाग दोन )

File photo

आजचे लोकप्रतिनिधी याच पाणी योजनेचे राजकारण करून जनतेची अडवणूक करतात. प्रकल्प उभारण्याचा उद्देश विकासगंगा होता. आज मात्र या प्रकल्पाच्या पाण्यावर मोठे राजकारण चालते, असो. प्रकल्पाशेजारील शेतजमिनीला व मराठवाड्याला पिण्याच्या व शेती, पाटपाणी व औरंगाबाद शहरास व येथील औद्योगिक वसाहतीस विकासाच्या एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणारा हा प्रकल्प बहुउद्देशीय ठरला. शेती विचार करता शेवगाव-नेवासा तालुक्‍याने उपसा जलसिंचन योजना उभारून जिरायत परिसर पूर्णत: बागायती केला. परिसरात आज उभी असलेली ऊस शेती एक जंगलच. प्रकल्पानंतर अनेक वर्षे या परिसरातील अवकळा हटली नव्हती.

मात्र, शेवगाव-नेवासा मतदारसंघाचे भाग्यविधाते व परिसराच्या कायापालटास कारणीभूत ठरलेले लोकनेते म्हणून बिरुद लावण्यास पात्र ठरलेले स्व. मारुतरावजी घुले पाटील यांच्या दूरदृष्टीने व त्यांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचा हक्क समजावून सांगितला व प्रकल्पातील पाण्यावर शेतकऱ्यांचा असलेला हक्क दिला. त्यासाठी जिल्हा बॅंक व सेवा सहकारी सोसायटी माध्यमातून आर्थिक रक्कम कर्जरूपी देऊन ऐतिहासिक अशी वैयक्तिक उपसा जलसिंचन योजना शेतकऱ्यांना उभारण्यास प्रोत्साहित केले. प्रकल्पातून 15-20 किलोमीटर अंतरावर शेतीसाठी पाइपलाइनद्वारे पाणी नेले गेले. त्यातून जिरायत मात्र काळी कसदार जमिनीचा हा परिसर बागायती बनला. ऊस कारखाने उभारले गेले व या बॅकवॉटरच्या पाण्यावर परिसरात ऊस शेती हळूहळू आपले पाय पसरू लागली. उसाबरोबर नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कपाशी शेतीकडे व पैशाची लॉटरी समजल्या जाणाऱ्या कांदा शेतीने मोठे क्षेत्र व्यापले.

जायकवाडी प्रकल्पाकडेचा परिसर बनलाय ऊस शेतीचे आगर…(भाग एक)

हमखास पाणी उपलब्ध, भारी जमीन व आधुनिक तंत्रज्ञान-खते-बहुपीक पध्दत याने झपाट्याने हा परिसर बागायती बनला असून, ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या या परिसराची प्रकल्प निर्मितीने पुसली गेलेली ओळख बागायती पीक असलेल्या ऊस शेतीने हा परिसर व्यापला असून उसाचे आगर म्हणून नवी ओळख या परिसराला निर्माण झाली. पाणी उपलब्धतेने उसाचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी आज नानाविध प्रकारे प्रयोग करून शेतीत कुठलेही पीक विक्रमी उत्पादन करत असून ऊस, कापूस, गहू,, कांदा, केळी बागा या मुख्यत्वे करून शेतकऱ्यांच्या लक्ष्य ठरल्या व ही पिके विक्रमी उत्पादित करून परिसरातील नागरिकांची आर्थिक सुबत्ता सुधारली, तर या पिकानंतर आज परिसरात डाळिंब पिकाने मोठे क्षेत्र व्यापले असून एक नगदी पीक ठरले आहे. पाणी उपलब्धतेने मोठी वृक्षराजी या परिसरात उभी असून, एकप्रकारे जंगल भाग म्हटले तर वावगे ठरू नये. जायकवाडी प्रकल्प संपादित गावांचा कर्दनकाळ ठरला असला तरी त्याच संपादित भागातील कुटुंब ही जलसाठ्याच्या कडेला विस्थापित झाली होती आणि अपार कष्ट करून आज आर्थिक सुबत्ता उपभोगताहेत. एकूणच या प्रकल्पाकडेचा परिसर कायमस्वरूपी बागायती बनला असून, हा प्रकल्प या परिसराच्या कायापालटास कारणीभूत ठरला आहे. आजची सद्य परिस्थिती पाहता हा भूभाग “सुजलाम्‌-सुफलाम्‌’ झाला असून एक प्रकारचे नंदनवनच झाले आहे.

  शंकर मरकड 

 भावीनिमगाव, ता. शेवगाव 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)