जायकवाडी प्रकल्पाकडेचा परिसर बनलाय ऊस शेतीचे आगर…(भाग एक)

File photo

जायकवाडी (नाथसागर) गोदावरी नदीवरील एक ऐतिहासिक व बहुउपयोगी ठरलेला प्रकल्प. 1972 भयानक दुष्काळी वर्ष ठरले. पीक पाण्याचा कुठलाच ठाव या वर्षांत लागला नाही हे जुन्या जाणत्या व्यक्तींकडून आजही बोलले जाते. ऐतिहासिक दुष्काळी परिस्थिती यावर्षी आली. आजही 60-70 वर्षे वयोमान असलेल्या व्यक्तींकडून प्रसंगी या सालाची आठवण करून दिली जाते. जसे कुणी हावरटपणे खात असेल तर ते म्हणतात “अरे काय बहात्तरच्या दुष्काळातून आला की काय?’ किंवा आजही पावसाळा ऋतू लांबला की, 1972 सालच्या दुष्काळी आठवणी ताज्या होतात, इतकी भयानक परिस्थिती होती.

नागरिकांच्या हाताला काम नाही, खायला दाणे नाही अशी परिस्थिती होती. शासनाने यावर्षी ऐतिहासिक कामे राबविली. त्यातीलच एक ऐतिहासिक असा जायकवाडी प्रकल्प उदयास आला. दूरदृष्टी ठेवून त्यावेळच्या सरकारने या प्रकल्पाची निर्मिती केली. कुठल्याही डोंगरदरीचा आधार नाही, की ओसाड जमिनीचा भाग. काळ्या कसदार जमिनीवर बांधण्यात आलेले मातीचे सर्वात मोठे धरण. मराठवाडा हा दुष्काळी भाग व ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता या प्रकल्पाची उभारणी एका सपाट भूभागावर करण्यात आली. गोदावरी नदीकाठचा हा सुपीक परिसर या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आला.

शेकडो गावे स्थलांतरित करण्यात आली. नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी दोन दोन (नगर जिल्ह्यातील शेवगाव – नेवासा, तर औरंगाबादमधील गंगापूर – पैठण) तालुक्‍याचा मोठा भूभाग संपादित होऊन शेकडो गावे उद्‌ध्वस्त झाली. काळ्या कसदार जमिनी पाण्याखाली गेल्या आणि ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या या परिसराची ओळख कायमची पुसली गेली. प्रकल्प निर्मितीनंतर 20-25 वर्षांनंतर या परिसरात यांत्रिक युग अवतरले. आमदार, खासदार यांच्या विशेष प्रयत्नांतून इलेक्‍ट्रॉनिक मोटार पाणी उपसा जलसिंचनसाठी बसवण्यात आले. प्रकल्पबाधित चारही तालुक्‍यांतील प्रकल्पाशेजारी शेकडो किलोमीटर पिण्याच्या पाणी योजनेचे पाणी पाइपलाइनद्वारे पोहोचविण्यात आले. त्याचे काम आजतागायत सुरू असून, दुष्काळी समजल्या जाणाऱ्या शेवगाव-पाथर्डी या तालुक्‍यांना आज सगळीकडे जायकवाडी प्रकल्पाचेच पाणी पिण्यासाठी आहे. पैठण, गंगापूर, नेवासे या तालुक्‍यातही दूरवर पाणी योजना पोहोचवून त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला होता.

 

  शंकर मरकड 

भावीनिमगाव, ता. शेवगाव 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
13 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)