जायकवाडीला पाणी सोडण्यास पालकमंत्र्यांचाही विरोध

संग्रहित छायाचित्र...

पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न नसल्याने फेरनिर्णयाची आवश्‍यकता असल्याचा सूर
संगमनेर – जायकवाडीला डोळ्यांदेखत पाणी जात असले, तरी समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय तत्कालीन राज्यकर्ते व त्यांच्या नेतृत्वाने घेतला आहे. लवाद, न्यायालयाचे निर्णय आणि कायद्याच्या अनुषंगाने पाणी सोडणे क्रमप्राप्त असले, तरी सध्या तेथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न नसल्याने यावर फेरनिर्णयाची आवश्‍यकता असल्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. जायकवाडीचे पाणी पेटले असताना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीदेखील या पाण्याला विरोध दर्शविल्याने पाणीवाद आणखी पेटणार आहे.
प्रा. शिंदे दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी संगमनेरमध्ये आले होते. या वेळी जायकवाडीला सोडल्या जाणाऱ्या पाण्यासंदर्भात त्यांना विचारले असता, सद्यस्थितीत या निर्णयात बदलाची आवश्‍यकता आहे. तत्कालीन मंत्र्यांच्या निर्णयाची री ओढत त्यांनी धरणातून शेवटपर्यंत पिण्यासाठी पाणी दिले पाहिजे; मात्र सध्या जायकवाडीच्या लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न नसतानादेखील हे पाणी डोळ्यांदेखत खाली जात आहे. यापूर्वीच जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित होते; मात्र समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 मध्ये तयार करण्यात आला आहे. हा कायदा करताना सर्वंकष विचार करणे अपेक्षित होते. त्यावेळी पुरेसा विचार झाला नसल्याने आतादेखील पाणी सोडावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात दुष्काळ तीव्र होत असताना लोकांच्या डोळ्यांदेखत येथील पाणी जायकवाडीसाठी वाहून जाते आहे. जायकवाडीत पाणी असतानादेखील लवाद, न्यायालयाचे निर्णय आणि कायद्याच्या अनुषंगाने पाणी सोडणे प्रशासनाला बंधनकारक ठरत आहे. कायदा करतानाच तत्कालीन राज्यकर्ते आणि त्यांच्या नेतृत्वाने यात नीट लक्ष घालणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायदा व मेंढेगिरी समितीच्या अहवालावर दर पाच वर्षांनी आढावा घेतला जायला हवा. पाच वर्षांनंतर काय स्थिती आहे, याची पडताळणी करण्याची आवश्‍यकता आहे. अन्याय होत राहिला, तर जवळच्या माणसाला पिण्यासाठी पाणी नाही आणि लांबच्या माणसाला दिले जाते, अशी स्थिती निर्माण होईल. पिण्यासाठी पाणी दिले पाहिजे; मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता जायकवाडीत नाही, अशा स्थितीत पाणी जायकवाडीत असल्याने याचा विचार व्हायला हवा, असे देखील प्रा. शिंदे म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)