जायकवाडीच्या अभियंत्यांविरोधात गुन्हा नोंदवा

नेवासा-माहितीच्या अधिकारात चुकीची माहिती दिल्यामुळे जायकवाडी धरणाच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्त्यांनी केली आहे.

मुकिंदपूर येथील नानासाहेब कराडे, उस्थळचे दादासाहेब चंद्रभान वाघ व बाभूळखेड्याचे कुंडलिक चांगदेव चिंधे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळे जलसंपदा खात्यात खळबळ उडाली आहे. आंदोलकांनी माहितीच्या अधिकारात जायकवाडी प्रकल्पाची तांत्रिक माहिती मिळवली होती. त्यात कार्यकारी अभियंता अशोक चव्हाण व शाखा अभियंता जगताप यांनी दिलेल्या माहितीचे (14 जाने.) अवलोकन केले असता दोन्ही माहितीमध्ये फरक जाणवला. खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते 5 जानेवारी 2017 रोजी जायकवाडी धरणाची तांत्रिक माहिती मिळावी, या मागणीसाठी नेवासे तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. त्यावेळी जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता अशोक चव्हाण व जगताप यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून शंकेचे समाधान केले. परंतु, उपोषणकर्त्यांनी जायकवाडी धरणाची काही माहिती मागितली असता ती दहा दिवसांत देण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले.

जायकवाडी धरणाची नदीची बेडलेव्हल ते टीबीएलपर्यंत 30 मीटर उंची येत आहे, असे कार्यकारी अभियंता अशोक चव्हाण यांनी दिलेल्या 14 जानेवारीच्या माहितीवरून स्पष्ट दिसत आहे. पण, प्रत्यक्षात जायकवाडी धरणाची नदीची बेडलेव्हल ते टीबीएलपर्यंत 37 मीटर उंची येत आहे, असे प्रकल्प अहवालात दिलेल्या माहितीच्या आधारात लक्षात येते. त्यामुळे उपोषणकर्त्यांचे समाधान झाले नाही.

धरणाची उंची झाली कमी

धरणाच्या फाउंडेशनच्या मापात 4 मीटर, पाण्याच्या पातळीच्या मापामध्ये 6 मीटर आणि डाव्या कालव्याच्या पातळीत 2 मीटर उंचीचा फरक दिसून आला. एकंदरीत माहितीतील तफावतीमुळे धरणाची उंची तब्बल 44 फूट कमी दिसत आहे. चुकीच्या माहितीमुळे जायकवाडी धरणाच्या सर्वच मोजमापात फरक झाला आहे. मृत व उपलब्ध पाणीसाठ्यात फरक पडला आहे. त्यावर आधारित समन्यायी पाणीवाटपदेखील चुकले आहे. जायकवाडीत कागदोपत्री कमी पाणीसाठा दिसत असल्याने नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणे ऐन उन्हाळ्यात रिकामी करून जायकवाडीला पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)