जामखेड शहरावर घोंघावते पाणी टंचाईचे संकट

भूतवडा तलावातील पाणीसाठा झाला कमी

जामखेड – पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या जामखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भूतवडा तलावात अवघा 30 दशलक्ष घनफूट इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला असून त्यापैकी केवळ 10 दलघफू पाणीसाठा वापरा योग्य आहे. येत्या आठवडाभरात मोठा पाऊस पडला नाही तर शहराला पाणी टंचाईच्या मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
भूतवडा तलावाला तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी विशाल नाईकवाडे, ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता जोशी, लघुपाटबंधारेचे ढेपे, जल व मृदूसंधारणचे साळुंखे, महावितरणचे गावित, टंचाई शाखाचे इनामदार यांच्या संयुक्त पथकाने भूतवडा तलावाची पहाणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
119 दलघफू क्षमता असलेल्या भूतवडा तलावात फक्‍त 30 दशलक्ष घनफूट इतकाच साठा शिल्लक आहे. त्यापैकी केवळ 10 दलघफू पाणी वापरात येवू शकते. उर्वरित 20 दलघफू हा मृत साठा आहे, अशाही परिस्थित असताना तलावातून अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्या शेकडो विद्यूत मोटारी आढळून आल्या. पहाणी पथकाने 10 स्टार्टर जप्त केले. काही विद्यूत मोटारींचे डायरेक्‍ट डिपीतूनच कनेक्‍शन असल्याचे आढळले तेही कनेक्‍शन पथकाने तोडले. अनेकवेळा नगरपरिषद प्रशासनाने अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांना तंबी दिली. मात्र, कोणीही ऐकत नसल्याने यावेळी तलाव परिसरात सिंगल फेज लाईन केली आहे. यानंतरही कोणी पाणी उपसा करतांना आढळून आले तर त्यांच्यावर गुन्हा सरळ दाखल केला जाईल, असे मुख्याधिकारी विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.
आठवडाभरात मोठा पाऊस न झाल्यास सध्या 6 दिवसांनी पाणीपुरवठा करावा लागत आहे. ही स्थिती राहिल्यास पाणीपुरवठ्याच्या कालावधीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. काही दिवसांपासून शहराला पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. तलावात पाणी पूरेसे शिल्लक नसतांना प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी मनापासून लक्ष दिले नाही.
जामखेड शहराला पाणीटंचाई भासणार याची पूर्व कल्पना असूनही पाणी वितरणात अनियमितता असून नगरसेवकांची मर्जी सांभाळणारे व्हॉलमन काही भागावर पाणीपुरवठा विभागाची मेहेरनजर आहे. नळाला तोट्या नसल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी बोगस नळजोड सर्वात महत्वाचे म्हणजे शहरात पाणी टंचाई असतांना बांधकामावर कारवाई नाही, बंधन नाही, प्रशासनाच्या या सर्व चूका पाणी टंचाईला कारणीभूत आहेत.

तोट्या नसलेले नळकनेक्‍शन तोडणार
शहरावर निर्माण झालेल्या पाणीटंचाईला नागरिक पण तितकेच जबाबदार आहेत. शहरात अनेक ठिकाणी नळाला तोट्या नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. यापुढे तोट्या नसलेले नळ कनेक्‍शन तोडले जाईल. नागरिकांनी टंचाई काळात पाण्याचा योग्य वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)