जामखेड – नगरपालिकेच्या विषय समितीच्या सभापतींच्या निवडी नुकत्याच बिनविरोध झाल्या असून, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतिपदी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, पाणीपुरवठा सभापतिपदी बिभीषण धनवडे, महिला-बालकल्याण सभापतिपदी लता संदीप गायकवाड यांची वर्णी लागली.
यावेळी अन्य तीन समित्यांच्या सभापतींच्या निवडीही बिनविरोध झाल्या. पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी काम पाहिले. निवडीनंतर नगराध्यक्षा अर्चना राळेभात यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर, नगराध्यक्षा अर्चना राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, गणेश आजबे, शामीर शेख, निखिल घायतडक, गुलचंद अंधारे, वैशाली झेंडे, सुरेखा राळेभात, विद्या वाव्हळ, सुमन शेळके, भाजपचे शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात उपस्थित होते.
जामखेड नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ताब्यात आल्यानंतर 7 महिन्यांपूर्वी भाजपचे शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात यांच्या पत्नी अर्चना राळेभात या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. तेव्हापासून नगरपालिकेमधील विविध विषय समित्यांच्या रखडलेल्या निवडी अखेर जाहीर झाल्या असून, त्यानुसार स्वच्छता, आरोग्य समितीच्या सभापतिपदी उपनगराध्यक्ष निमोणकर, पाणीपुरवठा सभापतिपदी धनवडे, महिला-बालकल्याण सभापतिपदी लता गायकवाड, बांधकाम समितीच्या सभापतिपदी राजश्री मोहन पवार, शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापतिपदी फरिदा आसिफ खान, तर नियोजन विकास समिती सभापतिपदी ऋषिकेश बांबरसे यांच्या निवडी करण्यात आल्या. स्थायी समितीचे सभापतिपद हे पदसिद्ध नगराध्यक्षांकडे असते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री राम शिंदे यांनी अभिनंदन केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा