जामखेड पालिकेच्या नगराध्यक्षपदी घायतडक

पालकमंत्र्यांची पकड आणखी घट्ट; उपनगराध्यक्षपदी पठाण
जामखेड- जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निखिल घायतडक तर उपनगराध्यक्षपदी फरिदा पठाण यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. परंतू दोघांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज माघे घेतल्याने निवड बिनविरोध झाली. उपनगराध्यक्षपदासाठी झालेली रस्सीखेच व त्यानंतर बिनविरोध निवडीने या चुरसवर पडदा पडला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मोठ्या खुबीने दोन्ही निवडी बिनविरोध करून नगरपालिकेवर पकड आणखी घट्ट केली. दोन्ही नगरसेवक अधिकृत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत.
जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगरपालिका कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2 च्या सुमारास विशेष सभा झाली.नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दि. 27 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत निखिल घायतडक यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार हे निश्‍चित होते. त्यानुसार नगराध्यक्षपदासाठी निखिल घायतडक यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या सकाळी 10 ते 12 या वेळेत पालकमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे फरिदा पठाण यांनी सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर नाराज झालेल्या वैशाली ज्ञानेश्वर झेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या क्षणी विरोधी गटाकडून कमल महादेव राळेभात यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीची शक्‍यता निर्माण झाली होती.
परंतु दोन तासाच्या कालावधीत चर्चा, बैठकी झाल्या. 2 नगराध्यक्षपदी घायतडक यांची निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या तीन उमेदवारी अर्जाची निवडणूक निर्णय अधिकारी नष्टे यांनी छाननी केली. यापैकी वैशाली झेंडे यांच्या उमेदवारी अर्जावर दोन वेगवेगळ्या सह्या असल्याने तो उमेदवारी अर्ज नामंजूर केला. तर फरिदा पठाण व कमल राळेभात यांनी उमेदवारी अर्ज मंजूर केले. यानंतर कमल राळेभात यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे उपनगराध्यक्षपदी फरिदा पठाण यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी जाहीर केले.
नगराध्यक्ष निवडीच्या नंतर दोन गटाला न्याय देण्यात आला. त्यामुळे काही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता दिसुन आली. यावर पालकमंत्री शिंदे यांनी राजकीय खेळी करून दुसऱ्या गटाची उपनगराध्यक्ष निवडणुकीत नाराजी दूर केली. जे उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. त्यांच्या आशेवर पाणी पडले.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून फटाक्‍यांच्या आतषबाजी केली. यावेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष निखिल घायतडक म्हणाले, पालकमंत्री राम शिंदे यांनी टाकलेल्या विश्वासामुळे माझी निवड बिनविरोध केली. त्याबदल्यात ना. शिंदे व सर्व नगरसेवकांचे आभार मानले. यावेळी माती नगराध्यक्ष अर्चना राळेभात, माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, डॉ.ज्ञानेश्वर झेंडे, प्रविण सानप, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)