जामखेड पालिकेची कृपा; म्हेत्रे वस्तीकडे जाणारा रस्ता “जलयुक्‍त’

तळेगाव-दाभाडे : तळेगाव-चाकण राज्यमार्गावर खड्डे पडल्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

विद्यार्थ्यांची कसरत : चिखलातून वाट काढत शाळेपर्यंत करावे लागते मार्गक्रमण

जामखेड – नगरपरिषदेच्या कृपादृष्टीने शिवार जलयुक्‍त होण्याऐवजी रस्तेच जलयुक्‍त झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. शहरातील प्रभाग क्र. 20 मधील म्हेत्रेवस्ती (फुलमळा) येथे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. विद्यार्थ्यांना अक्षरशः दोन फूट खड्ड्याच्या रस्त्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे.

म्हेत्रे वस्तीवरील रस्ता पाऊस पडल्यानंतर अत्यंत खराब झाला आहे. परिसरातील नागरिक, शाळकरी मुले-मुली जामखेडला येणे अवघड होऊन बसले आहे. ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना आश्‍वासन देणाऱ्या पुढाऱ्यांनाही लक्ष देण्यास वेळ नाही. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, अनास्था पाहता येथील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

शहरापासून 1 कि.मी. अंतरावर असणाऱ्या 300 लोकवस्तीच्या म्हेत्रे वस्ती, जुना रत्नापूर रस्ता, अहल्यानगरला जाण्यासाठी जवळचा रस्ता आहे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत. अनेकवेळा पालकमंत्री राम शिंदे यांना निवेदन देऊनही या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. लोकप्रतिनिधींना अनेकदा साकडे घालण्यात आले. या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याची अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, नगरपरिषद, बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना कळेना व लोकप्रतिनिधींना समजेना अशीच अवस्था तालुक्‍यातील सर्वसामान्यांची झाली आहे. ग्रामस्थ संताप व्यक्‍त करत आहेत. असे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तसेच, शहरातील रस्त्यांची दरवर्षी बांधकाम विभागाकडून किरकोळ डागडुजी केल्यानंतर निधी उपलब्ध करून रस्त्याच्या समस्या सोडविल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जातो. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती पाहिली असता अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करून ठेकेदार केवळ निधी उकळण्याचे काम करीत असल्याची अनेक उदाहरणे जामखेड तालुक्‍यात पहावयास मिळतात. अनेक गावांच्या रस्त्यांबाबत निधी उपलब्ध होऊनही काम होत नसल्याने ग्रामस्थ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारतात. पावसाच्या काळात शिवार जलयुक्‍त दिसण्याऐवजी रस्तेच जलयुक्‍त दिसत असल्याने सरकारने तालुक्‍याला रस्त्याला जलयुक्‍त केल्याप्रकरणी दखल घेण्याची मागणी सर्वसामान्यांकडून मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

जामखेड येथील म्हेत्रेवस्ती (फुलमळा) येथील रस्त्याची बिकट परिस्थिती झाली आहे. रस्ता नसल्याने कोणी दगावल्यास मृतदेह झोळी करून आणावे लागत आहे. अशी मेहेत्रे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी नितीन मेहेत्रे या विद्यार्थ्याला रस्ता नसल्याने वेळेवर उपचार मिळाला नाही. त्याचा मृत्यू झाला होता. पाऊस पडल्यानंतर विद्यार्थी शाळेत येत नाही. तरी शासनाने तत्काळ दाखल घेऊन रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावावा अन्यथा नगरपरिषदेसमोर आंदोलन करण्यात येईल. राजेंद्र म्हेत्रे, नागरिक, म्हेत्रेवस्ती, जामखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)