चतुर्थ श्रेणी 120, तृतीयश्रेणी 40 कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्याची रक्कम खात्यातून परस्पर वर्ग
जामखेड – “साहेबांनी तुम्हाला एवढे पैसे मिळवून दिले आहे, तुम्ही या विड्रॉल स्लिपवर सही करा,’ असे सांगत नगरपरिषदेच्या 200 वर कर्मचाऱ्यांच्या सह्या घेऊन नगरपरिषदेलाच 13 लाखांचा गंडा घातल्याच्या प्रकार जामखेड नगरपरिषदेमध्ये घडला आहे. इतकी गंभीर घटना घडूनही कोणी काही बोलण्यास तयार नाही. जामखेड नगरपालिकेच्या चतुर्थश्रेणीतील 120 कर्मचारी व 40 तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मिळालेल्या महागाईभत्त्याची रक्कम बॅंक खात्यात वर्ग झाल्यानंतर तासाभरातच या कर्मचाऱ्यांच्या खात्यातील प्रत्येकी 6 ते 15 हजार रुपये काढल्याचा संदेश या कर्मचाऱ्यांना मोबाइलद्वारे मिळाला. अशा प्रकारे जवळपास 13 लाख रुपयांच्या रकमेस पाय फुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यातून कोणी व कशी काढली? याचीच पालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
काही कर्मचा-यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वीच्या जामखेड ग्रामपंचायतीचे 160 कर्मचारी नगरपालिकेत सामावून घेतल्यानंतर त्यांना सरकारकडून 18 महिन्यांच्या महागाईभत्ता फरकापोटी प्रत्येकी 54 हजार रुपये असे एकूण 86 लाख 40 हजार रुपये मिळाले. महिनाभरापूर्वी पालिकेच्या महाराष्ट्र बॅंकेतील खात्यात ही रक्कम जमा झाली. पालिकेने 19 एप्रिलला ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली. 18 एप्रिलला पालिकेच्या काही कर्मचा-यांनी दोनशेहून अधिक विड्रॉल स्लिप महाराष्ट्र बॅंकेतून आणल्या होत्या. 19 एप्रिलच्या पहाटे सहाच्या सुमारास दोन कर्मचा-यांनी सफाई कामगारांना बोलावून “साहेबांनी तुम्हाला एवढे पैसे मिळवून दिले आहे, तुम्ही या स्लिपवर सह्या करा अन्यथा पैसे परत जातील,’ असे सांगितले. त्यामुळे कर्मचा-यांनी विड्रॉल स्लिपवर सह्या केल्या. कर्मचा-यांच्या महाराष्ट्र बॅंकेतील खात्यात 19 तारखेस प्रत्येकी 54 हजार रुपये जमा झाल्यानंतर एका तासातच 120 कर्मचा-यांचे सहा हजार रुपये व 40 कर्मचा-यांच्या खात्यातील 15 हजार रुपये असे एकूण 13 लाख 20 हजार रुपये खात्यातून काढल्याचा संदेश संबंधित कर्मचा-यांना मोबाइलद्वारे प्राप्त झाला.
हा संदेश मिळताच कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणातील तो “साहेब’ नेमका कोण? याविषयी चर्चा होत आहे. दरम्यान, नगरपालिकेच्या मुख्याधिका-यांसह पदाधिकारी, अधिकारी याबाबत बोलण्यास तयार नसल्याने पालिका प्रशासनाचे याबाबतचे म्हणणे समजू शकले नाही. मुख्याधिका-यांना विचारले असता याबाबत आपणास काही माहिती नाही, चौकशी करून सांगतो, असे ते म्हणाले. पण, दोन दिवसांनंतरही त्यांच्याकडून या विषयीची माहिती मिळू शकली नाही.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा