जामखेडमध्ये खर्डा चौकात रास्तारोको ! पालकमंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

प्रशासनाची दिरंगाई तौसीफला आत्मदहनास प्रवृत्त करणारी : राळेभात

पालकमंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जामखेड: कर्जत शहरातील दावल मलिक देवस्थान ट्रस्टच्या जागेवरील अनधिकृत बांधकामांचे अतिक्रमणे हटविण्यात यावीत, या मागणीकरिता कर्जतमधील तौसीफ शेख या तरूणाने उभारलेल्या लढ्यात न्याय देण्यासाठी प्रशासनाने केलेली दिरंगाई तौसीफला आत्मदहनास प्रवृत्त करणारी होती. तौसीफला आत्मदहन करण्यास भाग पडणाऱ्या, पालकमंत्री राम शिंदेंसहीत सर्व अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत. तौसीफच्या मृत्यूची निवृत्त न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुकर राळेभात यांनी जामखेड येथे खर्डा चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

तौसीफला न्याय मिळवून देण्यासाठी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आक्रमक होत, गुरूवारी 11 वाजता जामखेड शहरातील खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले. यावेळी शहाजी राळेभात, अमजद पठाण, गणेश हगवणे, डिगांबर चव्हाण, अमित जाधव, नजीर सय्यद, परवेज सय्यद, हरिभाऊ आजबे, गणेश चव्हाण, इम्रान कुरेशी यांच्यासह कैलास हजारे, जमीर सय्यद, जावेद सय्यद, उमर कुरेशी, अमित जाधव, अझहर काझी, अमोल गिरमे, पवण राळेभात, परवेझ सय्यद, बापुसाहेब गायकवाड, हरिभाऊ आजबे, त्याचबरोबर व्यापारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. या आंदोलनात पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरोधात हल्लाबोल करत जोरदार टीका करण्यात आली.

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील एका युवकाला समाजहिताच्या लढाईत आत्मदहन करण्याची वेळ येते, याचा अर्थ पालकमंत्री राम शिंदे किती संवेदनशील आहेत, याचे राज्याला दर्शन झाल्याची टिका करण्यात आली. तौसीफचा लढा चिरडून टाकण्याचे षडयंत्र प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी राजकीय गुंडांच्या मदतीतून केले. मात्र लढवय्या तौसीफने हार न मानता लोकशाही मार्गाने आंदोलने करत होता. प्रशासनाकडून आंदोलनानंतर फक्त अश्‍वासने देऊन बोळवण करण्यात आली. तौसीफने अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलत आत्मदहनाचा इशारा देऊनही प्रशासकीय यंत्रणांनी याकडे केलेले दुर्लक्ष पाहता तौसीफची व्यवस्थेने ठरवून हत्या केली आहे, हेच यातून दिसून येत आहे. तौसिफच्या कुटूंबाला न्याय देण्यासाठी सरकारने तातडीने भरिव मदत जाहीर करावी.

तौसीफच्या मृत्यूला जबाबदार सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. कर्जतमधील दावल मलिक देवस्थानच्या जागेवर भाजपाच्या गुंडाची अतिक्रमणे होती. भाजपाच्या गुंडांना पालकमंत्र्यांनी अभय दिले. पालकमंत्र्यांचा आशिर्वादामुळेच कर्जतमधील ते अनधिकृत बांधकामे हटवली जात नव्हती. तौसिफच्या मृत्यूला पालकमंत्री जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप करीत पालकमंत्र्यांना सहआरोपी करण्याची मागणी सर्वच आंदोलकांनी केली. तब्बल दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे जामखेड शहरातून जाणाऱ्या सर्वच मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीवायएसपी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)