जामखेडच्या भुतवडा तलावासह चार तलाव ओव्हरफ्लो

जामखेड, (प्रतिनिधी)- तालुक्‍यात आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असून, आजअखेर सरासरी 100 टक्‍के पाऊस झाला आहे. जामखेड, अरणगाव, नान्नज, नायगाव या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव सायंकाळी सातच्या सुमारास ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच रत्नापूर, धोत्री, नायगाव हे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. पाच कोल्हापूर बंधारेही पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न वर्षभराचा सुटला आहे.

मागील दीड महिन्यापासून तालुक्‍यात पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, आठ दिवसांपासून शहर व तालुक्‍यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे तालुक्‍यातील विंचरणा, सीना, लेंडी, तसेच ओढे, नाले भरभरून वाहिले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच, तालुक्‍यातील रत्नापूर, धोत्री, नायगाव हे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. धोंडपारगाव तलाव भरण्याच्या मार्गावर आहे. जवळके, तेलंगशी या परिसरात पाऊस कमी झाल्याने या तलावात अद्यापि उंबरठ्याखालीच पाणीसाठा आहे. तसेच सांगवी, पिंपरखेड, जवळा, कवडगाव, गिरवली येथील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दोन दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो झाले आहेत.

तालुक्‍यात जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या प्रयत्नांतून जलसंधारणाचे मोठ्या प्रमाणावर काम झाले; ते सुध्दा पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात सर्वत्र जलक्रांती झाली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. तसेच विहिरी, बोअरला पाणी वाढले आहे. सध्या नदी, ओढे, नाले भरून वाहत आहेत. निसर्गाने हिरवागार शालू पांघरला आहे. तालुक्‍यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे व दुष्काळ हटला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)