जामखेडची जलवाहिनी झाली जुनाट

कालबाह्य जलवाहिनी झाल्याने जामखेडांचे आरोग्य धोक्‍यात

जामखेड – जामखेड शहरांर्तगत जलवाहिन्या जुनाट झाल्याने पाण्याची गळती वाढली असून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. नव्याने पाणीयोजनेचा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या काही महिन्यांपासून धुळखात पडून आहे. 105 कोटी रुपये खर्चाची पाणीयोजनेला मंजुरी मिळविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा पाठपुरावा सुरू आहे. परंतू ही योजना मंजुरी होत नाही. तोपर्यंत कालबाह्य झालेल्या जुनाट जलवाहिनीचे पाणी जामखेडकरांना प्यावे लागणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारी या जलवाहिनीला 46 वर्ष झाले आहेत. आज शहर झपाट्याने वाढत असून लोकसंख्या देखील वाढली आहे. त्यामुळे सध्याच्या पाणीयोजनेतून येणारे पाणी कमी पडत असून येणारे पाणी देखील ते कमी दबाने मिळत आहे. त्यामुळे ही जुनाट जलवाहिनी तातडीने बदलावी अशी मागणी होत आहे. त्यानुसार ना. शिंदे यांनी उजनी धरणातील दहिगाव योजनेतून जामखेडला पाणी आणण्याची योजना तयार करून त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिन्या 1972 मध्ये टाकण्यात आली आहे. ही पाणीयोजना करतांना त्यावेळीची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. आता शहर वाढले असून लोकसंख्यादेखील त्यावेळीपेक्षा चौपट झाली आहे. त्यामुळे सध्याच्या पाणीयोजनेवर ताण पडत आहे. ही योजना आता कालबाह्य झाल्याने वारंवार दुरुस्तीचे काम करावे लागत आहे. गळती सुरू होते. त्यातूनच अनेक ठिकाणी गटारीचे पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिश्र होत असल्याने अनेक नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे.
शहरात अनेक ठिकाणी जलवाहिन्यातून गळती होते. टंचाई निर्माण होऊन नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. जामखेड नगरपालिकेकडे जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी लागणारी सुसज्ज यंत्रणा नसल्याने दुरुस्तीचे काम दोन-तीन दिवस चालते. तोवर नागरिकांचे हाल होतात, हा नेहमीचाच अनुभव झाला. जलवाहिन्या कालबाह्य झाल्याने गळती थांबत नसल्याने पाणी असूनही शहरातील अनेक ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करावी लागल्याचे चित्र दिसते. भविष्यात जलवाहिनीला मोठी गळती अथवा समस्या निर्माण झाल्यास शहरातील नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी पर्यायी व्यवस्था केली नाही. पालिका प्रशासन व सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमधील कामाची उदासीनता दिसून येत आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 46 वर्षांची जलवाहिनी बदलल्यामुळे गळती कमी होऊन पाणी वाढणार आहे. नागरिकांना जास्त दाबाने पाणी मिळेल.
ना. शिंदे यांनी कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्‍यासाठी भरपूर निधी आणला. जामखेड शहरात सध्या कोट्यवधीची अनेक कामे सुरु आहेत. गल्ली बोळात नगरसेवकांनी पेव्हिंग ब्लॉक, भूमिगत गटारे, सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते तयार केले आहे. जलवाहिन्या बदलण्यासाठी निधीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे रस्ते करण्यासाठी निधी उपलब्ध असल्याने निधी परत जाऊ नये म्हणून सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे करताना जलवाहिन्या बदलण्याचा विषय मागे राहिला आहे.
मुख्यमंत्री पेयजल योजनेतून उजनी धरणातील दहिगाव योजनेतून नव्याने पाणी योजना उभारण्याचा प्रस्ताव ना. शिंदे यांनी शासन दरबारी पाठविला आहे. हे पाणी आणण्यासाठी 105 कोटींची योजना असून ट्रिम प्रोजेक्‍ट म्हणून हा प्रस्ताव मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. या योजनेमध्ये जामखेड पासून 60 किमी अंतरावर असलेले दहिगाव (करमाळा) येथून पाणी आणण्यासाठी जलवाहिनी त्याचबरोबर जामखेड शहरात अंतर्गत जलवाहिनी या निधीतून उभारण्यात येणार आहे. हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे मात्र विधानसभेच्या निवडणूक जवळ येत असल्याने पाणीपुरवठा योजनेला लवकर मान्यता मिळविण्यासाठी ना. शिंदे प्रयत्नशील आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)