जामखेडकरांची एमआयडीसीची प्रतीक्षा कायम 

जामखेडचे तत्कालीन आमदार व सध्या शिर्डीचे खासदार असलेल्या सदाशिव लोखंडे यांनी जामखेडला एमआयडीसी मंजूर करून आणली. 1999 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी एमआयडीसीचे भूमीपूजन केले होते. मात्र, एमआयडीसीचा गाडा पुढे गेला नाही.दुष्काळी तालुका म्हणून परिचित असलेल्या जामखेडला औद्योगिक वसाहत झाल्यास विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, एमआयडीसी प्रत्यक्षात येण्यास अद्याप मुहूर्त लाभलेला नाही. 

जामखेडसाठी सुमारे 19 वर्षांपूर्वी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मंजूर झाली. मोक्‍याच्या बीड रस्त्यालगत 52 एकर जागेवर नियोजित असलेल्या या एमआयडीसीचा फलकही येथे लावण्यात आला आहे. मात्र अद्याप तेथे कोणतेही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे जामखेडला मंजूर झालेली एमआयडीसी सुरू कधी होणार याची प्रतीक्षा आहे. मागील युती सरकारच्या काळात एमआयडीसीला मंजुरी मिळाली होती. युती सरकारच्या काळात 1997 मध्ये जामखेडचे तत्कालीन आमदार व सध्या शिर्डीचे खासदार असलेल्या सदाशिव लोखंडे यांनी जामखेडला एमआयडीसी मंजूर करून आणली. 1999 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी एमआयडीसीचे भूमीपूजन केले होते. मात्र, एमआयडीसीचा गाडा पुढे गेला नाही. सन 2000 मध्ये सत्तेत बदल झाल्यावर आघाडी सरकारने राज्यातील औद्योगिक वसाहती सहकारी औद्योगिक संस्थांना 99 वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खासदार सदाशिव लोखंडे यांचे समर्थक सतीश शिंदे यांनी स्थापन केलेल्या जामखेड सहकारी औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेला औद्योगिक वसाहत सुरू करण्यासाठी दिली.

मागील 16 वर्षांपासून ती त्यांच्या ताब्यात आहे. परंतु या काळातील स्थिती पाहता तालुक्‍यात तीन वेळा दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न तसेच 52 एकरांत होणारी मिनी औद्योगिक वसाहत यामुळे मोठा व्यावसायिक येथे येणे शक्‍य नाही. तरीही संस्थेने या जागेत 101 प्लॉट पाडण्याचा प्लॅन करून सरकारला सादर केला. या जागेत रस्ते, वीज याकरिता दोन कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. संस्थेकडे एवढी रक्कम नाही व सध्याची दुष्काळाची परिस्थिती पाहता औद्योगिक वसाहत सुरू करण्यास मोठा अडसर आहे. पंधरा वर्षांनंतर पुन्हा युती सरकार सत्तेवर आल्यानंतर आता औद्योगिक वसाहत सुरू होईल, अशी जनतेची अपेक्षा होती. परंतु गेल्या तीन वर्षांत याबाबत काहीच आश्वासक पाऊल पडलेले दिसत नाही. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे लक्ष घालतील व सेनेचे सुभाष देसाई कॅबिनेट उद्योगमंत्री आहेत, तर मतदारसंघाचे प्रतिनिधी राम शिंदे हे कॅबिनेट असून त्यांच्याकडे महत्त्वाचे जलसंधारण खाते आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात.

बेरोजगारांचे स्थलांतर 
सध्या तालुक्‍यात मराठवाड्याप्रमाणेच दुष्काळजन्य परिस्थिती आहे. शाश्वत रोजगाराची तालुक्‍यात कोणतीही सोय नाही. अनेक वर्षांपासून जामखेडला मिनी औद्योगिक वसाहत होण्याची मागणी नागरिक करत आहेत. मात्र, अद्याप मिनी औद्योगिक वसाहत झाली नसल्याने शहरातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण रोजीरोटीसाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. औद्योगिक वसाहतीसह जामखेड शहराला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी उजनी धरणाच्या फुगवट्यातून मिळावे यासाठी प्रयत्न झाले तर शहराचा व औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सुटून तालुक्‍याचा चेहरामोहरा बदलेल. शहर व तालुक्‍यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बीड रस्त्यालगत असलेली ही जागा सध्याच्या बाजारभावानुसार कोट्यवधी रुपयांची आहे. या जागेवर केवळ फलक लावण्यात आला आहे व एकोणीस वर्षांपासून ही जागा पडीक आहे. त्यामुळे ही नियोजित मिनी औद्योगिक वसाहत कधी सुरू होणार हा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. औद्योगिक विकास महामंडळाची उदासीनता आणि सरकारचे दुर्लक्ष
यामुळे हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही.

गरज राजकीय इच्छाशक्तीची 
विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रा. राम शिंदे यांनी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या समर्थकांचा या संस्थेशी संबंध आहे. त्यामुळे शिंदे आणि लोखंडे या दोघांनी ठरविले, एकत्र बसून निर्णय घेतला तर हा प्रश्न सुटू शकतो. राजकीय इच्छाशक्ती दाखवून त्यादृष्टीने पावले पडावीत, अशी जामखेडकरांची अपेक्षा आहे.

मधल्या काळात आघाडी सरकारने जामखेड एमआयडीसीची जागा करार पद्धतीने चालविण्यास देण्याच ठरविले. एका संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, हा प्रयोगही यशस्वी झाला नाही. प्रत्यक्षात तेथे कारखाने आलेच नाहीत. शिवाय ज्या शेतकऱ्यांची जमीन यासाठी संपादित करण्यात आली होती, त्यांना पूर्ण मोबदला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या जमिनी ताब्यात घेत अतिक्रमण केले. ज्या संस्थेला ही जागा कराराने देण्यात आली, तीही पुढे अडचणीत सापडली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रा. राम शिंदे यांनी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. शिर्डीचे खासदार सदाशीव लोखंडे यांच्या समर्थकांचा या संस्थेशी संबंध आहे. त्यामुळे शिंदे आणि लोखंडे या दोघांनी ठरविले, एकत्र बसून निर्णय घेतला तर हा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे आता हे दोन नेते काय भूमिका घेणार, याकडे तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

 

 

ओंकार दळवी 
प्रतिनिधी, जामखेड 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)