जाधव दाम्पत्य अवतरले ज्योतिबा-सावित्रीबाईंच्या वेशात

पिंपरी – राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या फुले पगडीच्या समर्थनानंतर आता फुले पगडी चांगलीच लोकप्रिय होऊ लागल्याचे चित्र पहायला मिळाले. माळी समाजाचे नेतृत्व करणारे भाजप नगरसेवक राहुल जाधव यांना पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदाची संधी मिळाली. हे जाधव दाम्पत्य महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेत महापालिका मुख्यालयात दाखल झाले. मात्र, महापौर निवडणुकीच्या प्रक्रियेत सर्वाधिक चर्चेत राहिली ती फुले पगडीच.

स्थायीच्या अध्यक्षपदावरून डावलल्यानंतर आता महापौरपदाकरिता देखील डावलण्याच्या शक्‍यतेने माळी समाज अस्वस्थ झाला होता. इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या महापौरपदी माळी नेतृत्वाला संधी देत, समाजाला न्याय देण्याची आग्रही भूमिका माळी समाजाने जाहीर पत्रकार परिषदेत घेतली होती. त्यानंतर महापौरपदी राहुल जाधव यांना उमेदवारी मिळाल्याचे जाहीर होताच माळी समाजाला आनंदाचे उधाण आले होते. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी राहुल जाधव व त्यांच्या पत्नी मंगल महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत मुख्यालयात दाखल झाले. मुख्यालयात प्रवेश करतानाच लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश करताना या मंदिराला वंदन करत मुख्यालयाच्या पहिल्या पायरीचे मोठ्या आदरभावाने माथा टेकवून दर्शन घेतले.

-Ads-

महापौरपदाची आपैचारिकता होण्यापुर्वीच मुख्यालय ढोल-ताश्‍याच्या आवाजाने दणाणले. जाधव यांची महापौरपदी निवड झाल्याचे जाहीर होताच मुख्यालयात एकच जल्लोष सुरु झाला. जाधव यांनी महापौरांच्या आसनावर बसण्यापुर्वी त्या आसनाला देखील वंदन केले. यानंतर राहुल जाधव यांचे अभिनंदन करण्यासाठी प्रत्येक जण सरसावत होता. महिलांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्यासारखे आडवे कुंकू लावले होते. तर सुमारे डझनभर समर्थकांनी फुले पगडी घातल्याने वातावरण “फुले पगडीमय’ झाले होते. महापौरपदाची निवड जाहीर झाल्यानंतर सभागृहात अनेक नगरसेवक, नगरसेविका यांना देखील फुले वेशभुषेतील जाधव यांच्यासोबत “सेल्फी’ काढण्याचा मोह आवरता आला नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)