जादुटोणा करणी करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीची फसवणूक करणाऱ्या दांपत्याचा जामीन फेटाळला

पतीचा नियमित, तर पत्नीचा अटकपूर्व जामीन फेटाळला


विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोने यांचा आदेश


पोलीस अधिकारी होण्यासाठी करणी करणे आवश्‍यक असल्याचे सांगून केली 2 लाख 88 हजारांची फसवणूक

पुणे- पोलीस अधिकारी होण्यासाठी जादुटोणा करणी करावी लागेल, असे सांगून अल्पवयीन मुलीची 2 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात महिलेचा अटकपूर्व, तर तिच्या पतीचा नियमित जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोने यांनी हा आदेश दिला आहे.
आशा विनोद कांबळे हिचा अटकपूर्व, तर पती विनोद दामू कांबळे (रा. जाधवनगर, गोसावी वस्ती, ता. हवेली) याचा नियमित जामीन न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणात सुरज झुंजार भोसले (रा. विश्रांतवाडी) याला अटक केली आहे. तर राहुल पाटील याच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत पीडित 17 वर्षीय मुलीने हवेली पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना सप्टेंबर 2017 ते 1 जुलै 2018 या कालावधीत हवेली तालुक्‍यातील जाधवनगर, गोसावी वस्ती येथे घडली. फिर्यादींना पोलीस अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी जादुटोणा करणी करणे आवश्‍यक असल्याचे सांगून तिच्याकडून रोख 88 हजार आणि तिच्या आईचे दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली. आशा हिने लाब केस असल्याने त्यावर करणीचा प्रभाव होत नाही, असे सागून फिर्यादींचे केस कापले. मनाशी लज्जा उत्पन्न होईल, असे घाणेरडे चाळे केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी विनोद याला अटक केली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने नियमित जामिनासाठी, तर त्याची पत्नी आशा हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. दोघांना जामीन मिळाल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणण्याची वा पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी दोघांचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. पाठक यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)