जादा दराच्या निविदांचा सपाटा सुरूच

पिंपरी – महापालिकेत विविध कामांसाठी राबविल्या जाणाऱ्या निविदा प्रक्रियेतील घोळ नवीन नाही. मात्र, प्राकलन दरापेक्षा जादा दराच्या निविदा स्वीकारण्याचा सपाटा सुरू झाला आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी वायसीएम रुग्णालयात काही नुतनीकरणाची कामे करण्यात येणार असून त्यासाठीही निविदा दरापेक्षा तब्बल 1 कोटी 37 लाख रूपयांची जादा दराची निविदा आल्याने एकूणच महापालिकेच्या कारभारावर संशयाचे मळभ दाटले आहे.

महापालिकेच्या अनेक निविदा प्रक्रियांवर नजर टाकता निविदा प्रक्रियेत ठरावीक लोकच सहभागी होत आहेत. तीन – तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही शेवटी गाडी जादा दरावरच येऊन थांबत आहे. त्यातून महापालिकेला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. आयुक्तांनी आजवर जे – जे प्रकल्प राबविले त्यासाठी जादा दराच्या निविदांचाच भार महापालिकेवर पडला आहे. त्यातून अधिकारी – पदाधिकारी – ठेकेदारांचे उखळ पांढरे होत असल्याचा आरोप होत आहे. आयुक्तांनी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत राबविलेली घरकुल योजना असो अथवा सद्यस्थितीतील अर्बन स्ट्रीट कामांची निविदा प्रक्रिया असो यामध्ये जादा दराच्या निविदा स्वीकारल्या गेल्याने एकूणच संशयाचे मळभ दाटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात (वायसीएमएच) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी काही आवश्‍यक कामे करावी लागणार आहेत. याशिवाय रूग्णालयातील नवजात अर्भक विभागाचे नुतनीकरण आणि डॉक्‍टरांच्या निवासस्थानाचेही नुतनीकरण केले जाणार आहे. टप्पा दोनमधील या कामांसाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. 30 कोटी 66 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 30 कोटी 47 लाख रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या.

त्यापैकी एस. एस. साठे या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 4.50 टक्के जादा दराने निविदा सादर केली. इतर ठेकेदारांपेक्षा त्यांचा दर लघुत्तम होता. सन 2018-19 च्या एसएसआर दरानुसार प्राप्त निविदा स्विकृत योग्य दरापेक्षा 9.81 टक्‍क्‍याने कमी येत आहे. प्राप्त निविदा मंजूर दराने म्हणजेच 31 कोटी 84 लाख रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 6 लाख 93 हजार रूपये, मटेरियल टेस्टींग चार्जेस 12 लाख 24 हजार रूपये असे 32 कोटी 3 लाख रूपयांपर्यंत काम करून घेण्यात येणार आहे. म्हणजेच या कामासाठी 1 कोटी 37 लाख रूपये वाढीव खर्च होणार आहे.

आयुक्‍त ठरतायेत टीकेचे धनी
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या विविध कामात टक्केवारी, ठेकेदारांचे हित जपण्यासाठी आखले जाणारे चढे दरांचे प्रस्ताव हे नेहमीच वादग्रस्त ठरत आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीच्या बळावर आखले गेलेले अमृत, पंतप्रधान आवास, स्मार्ट सिटी योजनेच्या प्रकल्पातील गौडबंगाल तर सगळ्यावर कडी करणारे ठरू शकेल असे एकंदर चित्र आहे. शहरातील पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी राबविण्यात आलेल्या प्रकल्पांच्या निविदा सुरुवातीपासूनच चढ्या दरांच्या आहेत. त्यामुळे आयुक्‍त श्रावण हर्डीकर कायम विरोधकांच्या टीकेचे धनी ठरत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)