जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
……………..
प्रभात वृत्तसेवा
पुणे – अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चर, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमासह व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू आहेत. यंदा प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र नसल्याने अर्ज करणे अडचणीचे होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी) बंधनकारक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांकडे सर्व प्रमाणपत्र आहेत, मात्र बहुतांश विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंटस्‌ युनियन ऑफ इंडिया यासह अन्य संघटनेने तंत्रशिक्षण विभागाकडे केली होती.
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सीईटी सेलमार्फत राबविण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र सक्‍तीचे करण्यात आल्याचे सीईटी सेलचे आयुक्‍त अनंत रायते यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी मोठी धावपळ होत होती. या सर्वाचा विचार करून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अधिसूचना प्रसिद्ध करून या विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
त्यानुसार राज्य सीईटी सेलने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रम संस्थांच्या निदर्शनास आणून द्यावेत, असेही सेलने तंत्रशिक्षण संचालनालयास कळविले आहे. त्यानुसारच सर्व सुविधा केंद्र आणि प्रवेश निश्‍चिती केंद्रांनी कार्यवाही करणे आवश्‍यक आहे, असेही तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी नमूद केले आहे.

जात वैधता प्रमाणपत्राचे वेळापत्रक
* बीई व बीटेक, बीफार्मसी व डी. फार्मसी, आर्किटेक्‍चर पदवी, पदवीस्तरावरील हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी, एमबीए व एमएमएस : 10 ऑगस्ट
* एमसीए : 19 ऑगस्ट
* एसएससी डिप्लोमा : 25 ऑगस्ट
* एचएचसी डिप्लोमा : 26 ऑगस्ट
* थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा : 23 ऑगस्ट

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)