जात वैधता प्रमाणपत्रासाठी 27 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत

पिंपरी – महापालिका आस्थापनेतील मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता 27 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीतही जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणतीही नोटीस न देता त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिका आस्थापनेवरील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र तपासणीसाठी पडताळणी समितीकडे अर्ज सादर केलेले नाहीत. याबाबत महापालिकेने 6 जून 2013 रोजी परिपत्रक काढले होते. अशा कर्मचाऱ्यांनी आपल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी आवश्‍यक त्या कागदपत्रांसह अर्ज संबंधित जात पडताळणी समितीकडे सादर करावेत. त्याबाबतची पोहोच कार्यालयाकडे सादर करावी. तसेच जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त होताच सेवा नोंद पुस्तकात नोंद घ्यावी. प्रमाणपत्र स्कॅन करण्यासाठी प्रशासन विभागात प्रत्यक्ष सादर करणे आवश्‍यक असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले होते. याबाबत यापूर्वीही कळविण्यात आले. मात्र, काही अधिकारी,कर्मचाऱ्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अद्यापही सादर केले नाहीत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 6 एप्रिल 2018 रोजी पुन्हा परिपत्रक काढले आहे.

आपण विशिष्ट जातीचे, जमातीचे आहोत, हे सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याच्या बाबतीत या कायद्यानुसार त्यांच्या सेवा समाप्त करण्याची तरतुद आहे. त्यानुसार, जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे अधिकारी, कर्मचारी प्रशासकीय कारवाईस पात्र आहेत. ज्या मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणूका या राखीव व खुल्या प्रवर्गातून झाल्या आहेत, अशा सर्वच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)