जामखेड – जातेगाव सरपंच पोपटराव गायकवाड यांच्यावर उपसरपंचसह सहा ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव सात विरूद्ध दोन मतांनी मंजूर करण्यात आला. अविश्वास ठराव बैठकीला सर्व नऊ सदस्य उपस्थित होते. जातेगाव ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास ठरावासंदर्भात तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजय भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या सर्व नऊ सदस्यांची बैठक सकाळी १०.४५ वाजता सुरू झाली. यावेळी तहसीलदार भंडारी यांनी दाखल अविश्वास ठरावाचे कारणे सांगितली. त्याचे निराकरण करण्याचे काम सरपंच पोपटराव गायकवाड यांनी केले. परंतु सदस्यांचे समाधान झाले नाही. यावेळी हातवर करून मतदान घेण्यात आले.

अविश्वास ठरावाच्या बाजूने उपसरपंच कौशल्या गायकवाड, रविराज गायकवाड, रेखा गायकवाड, दिपाली गर्जे, भाऊसाहेब गायकवाड, पुजा पोळ, आशाबाई गायकवाड यांनी हात वर केले. तर पोपटराव गायकवाड व दत्तात्रय गायकवाड हे दोघेच विरोधात राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी विजय भंडारी यांनी अविश्वास ठराव सात विरूद्ध दोन मतांनी मंजूर झाल्याचे जाहीर केले. अविश्वास ठराव बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी विजय भंडारी यांना ग्रामसेवक सुशीलकुमार शेळके व कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी यांनी साह्य केले. यावेळी पोपटराव गायकवाड यांनी सदर अविश्वास ठरावास जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)