वडिलांसह दोन भावांवर गुन्हा दाखल
शिक्रापूर- जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे शेतीला पाणी देण्याच्या किरकोळ वादातून दोन भावांनी व वडिलांनी मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जातेगाव बुद्रुक येथील अनिल इंगवले व त्यांच्या भावाच्या जमिनीच्या वाटण्या झालेल्या असून अनिल हे अनेक वर्षांपासून त्यांच्या वाट्याची शेती करतात. अनिल यांनी नवीन विद्युत केबल आणून त्यांच्या शेतीला पाणी दिले असताना त्याचे वडील नामदेव हे घरासामोर उभे राहून अनिल यांना शिवीगाळ करत होते. त्यावेळी अनिल याने तुम्ही मला शिव्या देऊ नका, मी नवीन केबल आणून शेतीला पाणी दिले आहे, तुम्ही पण नवीन केबल आणून शेतीला पाणी द्या, असे म्हटले. त्यावेळी अनिलचे वडील नामदेव यांनी अनिलला लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी अनिलचे भाऊ नितीन व प्रवीण यांनी देखील अनिलला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी अनिलची पत्नी भांडणे सोडविण्यास आली असता तिला मारहाण केली. याबाबत अनिल नामदेव इंगवले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी नामदेव किसन इंगवले, नितीन नामदेव इंगवले, प्रवीण नामदेव इंगवले यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल जगताप हे करीत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा