कराड- जातीयवादी भाजप सरकार उलथवून टाका

आ. अजित पवार : कराड येथे परिवर्तन यात्रेचे जंगी स्वागत

कराड – शेतकरी, मागासवर्गीय, आदिवासी, महिला, युवक, कामगार आदींच्या विरोधी असलेले जातीयवादी भाजप सरकार उलथवून टाका, परिवर्तनाची ताकद जनतेच्या मतातच आहे. नोटाबंदी काळात आरबीआयत जमा झालेल्या 15 लाख कोटी रुपयांत प्रचंड मोठा भ्रष्टाचार दडला असून यातील नकली, काळा व पांढरा पैसा याबाबत काहीही सांगितले जात नाही. निवडणुका आल्या की भाजप-सेनेला राम आठवतो, अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचे मंगळवारी कराडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजीत पत्रकार परिषदेत आ. अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंढे, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. अजीत पवार म्हणाले, भाजप सरकारची मुदत 2019 ला संपत आली असतानाही 2022 ला सर्वांना घरे देण्याची घोषणा केली जात आहे. यातच त्यांच्या भूलथापा दडलेल्या दिसून येतात. थापा मारण्यात मोदी आणि फडणवीस सरकारचा हात कोणीही धरु शकत नाही. महिलांवरील अत्याचार वाढून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सीबीआयपासून न्यायालयापर्यंत राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे एफआरपी मिळत नाही. भाव 3400 करा, ताबडतोब कारखानदारांना एफआरपी द्यायला सांगतो. जर राज्यकर्त्यांत धमक आणि ताकद असेल तर नडलेल्या माणसाला ताबडतोब मदत करता येते, पण यांना करायचेच नाही.

प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील म्हणाले, हे सरकार लोकहिताचे नाही हा अनुभव सर्वत्र असल्याने आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. भाजप-सेनेचे उमेदवार जिथे निवडून आले तिथे परिवर्तन करायचे आहे. सर्वच आघाड्यांवर भाजप सरकार अपयशी ठरले आहे. अनेक घटक पक्ष युतीतून बाहेर पडत आहेत. येत्या निवडणुकीत या सरकारला हद्दपार करण्याची गरज आहे. युतीच्या सत्तेत सर्वजण हैराण आहेत. सामान्यांना जगणे मुश्‍कील झाले आहे. वाराणसी, पंढरपुरात यांनी मोदी सरकारवर हल्ला केला आहे.

उध्दव ठाकरे हेच सरकारमध्ये राहून सरकारचे वाभाडे काढत आहेत. भाजपाचा पाच राज्यात झालेला पराभव डोळ्यासमोर त्याप्रमाणेच लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 1 फेब्रुवारीला सरकार अर्थसंकल्प मांडणार आहे. मात्र काहीही झाले तरी महाराष्ट्रातील जनता कदापि माफ करणार नाही. दिल्ली व मुंबईचे सरकार लोकांच्या मनातून उतरले आहे. त्यामुळे यावेळी परिवर्तन हे अटळच आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या चोरांच्या हातात सत्तेच्या चाव्या देवू नका, या विधानाचा समाचार घेताना आ. धनंजय मुंढे मोदी व फडणवीस सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, भाजप सरकारमधील 16 मंत्र्यांचा 90 हजार कोटींचा भ्रष्टाचार बाहेर काढला. मात्र मुख्यमंत्र्यांनी यांना पाठीशी घालण्याचा प्रकार केला आहे. याशिवाय तूरडाळ घोटाळा यासारखे बऱ्याच घोटाळ्यांवर भाजप सरकारचे नाव नोंदलेले आहे. यावरुन जनतेला चांगलेच ठाऊक झाले आहे की चोर कोण आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त सरकार ही भाजपाची घोषणा हवेत विरली आहे.

 

मोदींची बस चुकली

गेल्या निवडणुकीत अच्छे दिनफ ची स्वप्ने दाखवून भाजप सत्तेत आले. आता अच्छे दिनफ म्हटले की लोक हसतात किंवा शिवीगाळ करतात. पेट्रोल, गॅस, धान्य सर्वांनीच उच्चांक गाठला आहे. त्यांचे दर पाहिले की रात्री झोप येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्‍वासने खोटी ठरली असून त्यांची बस चुकली आहे.

 
44 जागांचा निर्णय

राष्ट्रवादी, कॉंग्रेस तसेच सेक्‍युलर पक्ष एकत्र येऊन आघाडी करीत आहोत. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुकांबाबत 44 जागांचा निर्णय झाला आहे.

साहेबांनी सर्वांना एकाच गाडीत घातले

साताराचे खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मनोमिलनाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पक्षश्रेष्ठींचे आदेश हे प्रमाण मानून राष्ट्रवादीची वाटचाल सुरु आहे. आमचे नेते शरदराव पवार यांनी सर्वानाच एका गाडीत घातले आहे. त्यामुळे यापुढील राजकीय वाटचाल सुरळीत होईल, असेही सूतोवाच आ. पवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)