जातींच्या भिंती दूर सारून आघाडीच्या पाठीशी उभे रहा

सातारा : सत्ता संपादन निर्धार मेळाव्यात बोलताना चंद्रकांत खडाईत.

चंद्रकांत खंडाईत : प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना आता दूर करा
सातारा, दि.13 (प्रतिनिधी)- लोकशाही प्रक्रियेत कोणताच लोकप्रतिनिधी सर्व जातींच्या मतांवर निवडून येत असतो. परंतु प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी वंचित बहुजन समाजामध्ये जातींच्या भिंती निर्माण करून सत्ता काबीज केली. मात्र, आता कायम सत्तेपासून वंचित राहिलेल्या घटकांनी प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना दूर करून सत्ता काबिज करण्यासाठी येत्या काळात जातींच्या भिंती बाजुला साराव्यात व एकत्रित येवून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी केले.
भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने नुकताच कोरेगाव येथे सत्ता संपादन निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. त्यावेळी पद्मश्री लक्ष्मण माने, हरीदास जाधव, रामचंद्र बनवडे, भरत लोकरे, बाळकृष्ण देसाई, अदिनाथ बिराजे, संगीताताई डावरे, विठ्ठलराव झेले- पाटील उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत खंडाईत म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून लोकशाही दिली. परंतु जाती- जातीमध्ये विभागलेल्या समाजरचनेमुळे आजपर्यंत प्रस्थापित राज्यकर्त्यांनी बुद्धीभेद करुन वंचित बहुजन समाज घटकांना लोकशाही प्रक्रियेपासून वंचित ठेवले. घटनेतील तरतुदीनुसार एक व्यक्ती, एक मत हा अधिकार मिळाला. मात्र, प्रस्थापित राज्यकर्त्यांनी हा मताचा अधिकार विकत घेण्याची ताकद आमच्यात आहे असे म्हणत गेली 70 वर्षे सत्तास्थानी राहिले. परंतु आता मताचे मूल्य वंचित बहुजन समाजाला समजले असून त्यांनी प्रस्थापित राज्यकर्त्यांना घरी बसवण्याचा निर्धार करावा, असे आवाहन खंडाईत यांनी केले.
पद्मश्री लक्ष्मन माने म्हणाले, अनुसूचित जाती-जमाती व आदिवासी यांना आरक्षणाने काही प्रमानात प्रतिनिधीत्व मिळाले. परंतु भटके-विमुक्त, ओबीसी, मुस्लीम, अल्पसंख्यांक यांना मात्र अद्याप प्रतिनिधीत्व मिळाले नाही. परिणामी हे समाज घटक सर्व बाजूने वंचित राहिले. त्यामुळे समान विकासाच्या मुद्दयावर छोट्या छोट्या समाजामध्ये विभागलेल्या वंचित घटकांनी एकमेकांना मते देवून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सत्ता संपादन करण्याचा संकल्प करून ऍड. प्रकाश आंबेडकर नेतृत्वाखाली सरकार आणण्यासाठी हातात हात घालून काम करु या, असे आवाहन माने यांनी केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)