जाता-जाता थंडीचा पुन्हा जोर

पुणेकर गारठले : नाशकात नीचांकी नोंद

पुणे – ढगाळ वातावरण आणि थंडीचा जोर कमी झाल्यामुळे राज्यात अचानक हवामानात बदल झाला. यामुळे गेल्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. तर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे असले तरी दोन दिवसांपासून थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. दरम्यान, आता फेब्रुवारी सुरू होण्यापूर्वी कमी होणाऱ्या थंडीने पुन्हा एकदा जोर पकडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात सोमवारी सर्वांत कमी नाशिक येथे 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पूर्व आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत हलक्‍या पावसाने हजेरी लावली. तर उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह येऊ लागल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे, पूर्वेकडील उष्ण व बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भात गुरुवारपासून हलक्‍या पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी झालेल्या गारपिटीने पिकांचे नुकसानही झाले. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही तापमानात घट झाली असून, किमान तापमान सरासरीच्या खाली घसरले आहे. पश्‍चिमी चक्रावातामुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हीमवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. पंजाब, राजस्थान, पश्‍चिम मध्य प्रदेश परिसरामध्ये किमान तापमानात 4 ते 5 अंशांची घट होऊन थंडीची लाट येण्याची शक्‍यता आहे. मध्य भारतातील किमान तापमानाही चढ-उतार होण्याचा अंदाज आहे. तर पहाटेच्या वेळी धुके पडण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मागील पंधरा दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीची लाट अनुभवायला मिळाली. त्यानंतर थंडीचा जोर कमी झाला आणि बहुतांश शहरातील किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ झाली. मात्र, विदर्भात अचानक झालेल्या पावसामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात रविवारी (दि. 27) दिवसभर ढगाळ वातावरण होते. या बदलेल्या वातावरणामुळे मध्य महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. दरम्यान, पुणे शहरातील किमान तापमानात किंचित वाढ झाली असली तरी हवेत गारवा असल्यामुळे चांगलीच थंडी जाणवत होती. शहरात 14 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)