जातक कथा – उंदीर पुराण

    नीती अनीती

स्थळ- मुंबई विधानसभा परिसर वेळ- वाईट

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजाने आपला हट्ट सोडला नाही. त्याने तावातावात सभागृहात भाषण केले व तरातरा सभागृहाबाहेर आला व ताडकन आपल्या निवासस्थानाकडे निघाला. राजा स्वतःशीच पुटपुटत निघाला. मधूनच शिव्यांची लाखोली तर मध्येच ‘जब अपने ही लगने लगे पराये’ हे गाणे भसाड्या आवाजात गाण्याचा प्रयत्न करतं मजल दरमजल करत निघाला. गाणं म्हणताना सुधीरभाऊ ऊर्फ सांभाची आठवण झाली व राजा खुदकन हसला. राजाला हसताना बघून लपून बसलेल्या वेताळाचीही भीड चेपली व थेट राजाच्या खांद्यावर येऊन बसला व फिदीफिदी हसू लागला.
‘राजा, फारच खुशीत दिसतो आहेस? नवे वर्ष सुरू होणार म्हणून? ‘
‘वेताळा, दुःख असह्य झाले ना की, माणूस असहायपणे परिस्थितीवर हसायला लागतो रे.’
‘तू राजा आहेस आणि तरी असहाय्य?’
‘देखी दुनिया की यारी, बिछडे सभी बारी बारी! जब अपने हो जाये बेवफा तो दिल टूटे..!
‘राजा, असे बिनाका गीतमालासारखे एकामागून एक गाणे का गातो आहेस? तुझा एक अलबम रिलीज झाला तर तू एवढा संगीतमय झालास? टेन्शन अती असेल तर आज तू तुला काय विचारायचे ते विचार, आज उत्तरे मी देतो.’
‘थॅंक्‍स वेताळा! मला सांग, उंदीर हे काय राजकारण करायचा प्राणी आहे? किती अधःपतन होणार राजकारणात? सिंह, वाघ, हत्ती, घोडेबाजार यावरून घसरून डायरेक्‍ट उंदीर? छे…?’
‘राजा, असा उदास होऊ नये. यासाठी जातक कथा वाचत जा, ज्या तुला “जाचक’ वाटतात. ऐक, एका जंगलातली वाघ आणि उंदराच्या मैत्रीची गोष्ट लक्षात आहे ना तुझ्या? कळले? अडचणी कुणालाही येतात राजा.’
‘पण वेताळा, इथे तर उंदराने वाघाला वेळोवेळी पाण्यात पाहिले आहे. युती तोडायची भाषा केली आहे. मग या वाघाची व उंदराची मैत्री कशी?’
‘राजा, संकटसमयी जो मदत करतो तो मित्र, या न्यायाने त्या दोघांच्या मनात जरी दुरावा असला तरी दोघांनी एकमेकांवरचे संकट ओळखून एकत्र येऊन तुला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताहेत बरं..!’
‘परंतु वेताळा मी राजा आहे. शिकारी नाही काही…’
‘राजा, तू एकतरी संधी सोडली आहेस का शिकारीची? मग ती शिकार वाघाची असो, उंदराची असो वा तुझ्याच मित्राची… अरे, स्वपक्षीयांना चार वर्षे डावललेस तू. आज उंदराची, वाघाची वा तुझ्या स्वकियांची वाट लागली ती तुझ्या कर्मामुळेच.’
‘वेताळा, तुझी ही हिंमत? माझ्याच खांद्यावर बसतो व माझ्या समोर वाघाचे व उंदराचे पोवाडे गातोस व माझ्या चुका दाखवतोस? थांब, तुझ्या कवटीची आज शंभर शकले केली नाही, तर मी ही राजा नाही…’ असे म्हणतं राजा कमरेची तलवार उपसतो व वेताळामागे धावू लागतो. वेताळ ही वांद्रेच्या दिशेला सूर मारून क्षणार्धात अदृश्‍य होतो.

– धनंजय


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)