जाणून घ्या तुम्हाला छान झोप लागण्यासाठी मदत करतील अशा सर्वोत्तम खाद्य पदार्थांबद्दल…

आधुनिक पुरुषाला किंवा स्त्रियांनाही दिवसभराच्या धावपळीपेक्षा रात्री पटकन झोप लागणं मोठं अवघड काम वाटायला लागलं आहे. व्यग्र वेळापत्रकातून झालेली दमणूक किंवा मानसिक आरोग्यावर असलेला तणाव कदाचित तुम्हाला पहाटेपर्यंत जागं ठेवत असेल. खरा प्रश्‍न असा आहे, की निरर्थक गोष्टींमधे जाणारा वेळ कमी करून शांत झोप कशी मिळवायची. चांगल्या झोपेसाठीची आदर्श सवय म्हणजे ठरलेल्या वेळेला झोपणे किंवा नियमितपणे ठरलेल्या वेळेलाच झोपणं. मात्र, तुम्हाला आश्‍चर्य वाटेल, की याचं उत्तर अतिशय सोपं आणि मूठभर नट्‌स किंवा चमचाभर मधात दडलेलं आहे. कारण, काही खाद्यपदार्थांमध्ये पटकन झोप लागण्यासाठीचे नैसर्गिक गुणधर्म आहेत. तुमच्या रोजच्या जेवणात त्यांचा समावेश केल्यानं शरीराला आवश्‍यक तितकी झोप मिळू शकेल. 

तुम्हाला छान झोप लागण्यासाठी मदत करतील असे सर्वोत्तम खाद्यपदार्थ पुढीलप्रमाणे आहेत – 

बदाम – बदामामध्ये भरपूर मॅग्नेशियम असतं, जे शांत झोप लागण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मॅग्नेशियमची शरीरातील पातळी खालावल्यास झोप लागण्यात अडचणी येतात. रोज बदाम खाल्ल्यानं मॅग्नेशियमची पातळी योग्य प्रमाणात राखली जाते.

कॉटेज चीज – भरपूर प्रमाणात आरोग्यदायी प्रथिनं असलेल्या कॉटेज चीजमध्ये भरपूर अमिनो असिड ट्रायप्टोफान असतात, ज्यातून सेरोटोनिनची पातळी वाढते. सेरोटोनिन हे मानवी शरीरासाठी आवश्‍यक हार्मोन आहे, ज्याच्या अभावामुळे एकाग्रता कमी होते आणि निद्रानाशासारखे आजार जडू शकतात. म्हणून शरीरातील सेरोटोनिनची पातळी समतोल राखण्यासाठी कॉटेज चीज खाणे आवश्‍यक आहे.

अक्रोड – अक्रोडामध्ये अमिनो असिड ट्रायप्टोफान हा झोप सुधारण्यासाठी मदत करणारा घटक मोठ्या प्रमाणावर असतो. या घटकामुळे शरीराचे वेळापत्रक, झोप लागण्याचे व सकाळी उठण्याचे वेळापत्रक व्यवस्थित राखणाऱ्या मेलाटोनिन व सेरोटोनिनची पातळी योग्य राहाते. अक्रोडातील मेलाटोनिनमुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.

मध – मध कुणाला आवडत नाही? मधात असलेल्या ग्लुकोजमुळे मेंदूला निद्रानाश, उत्तेजना आणि भूक इत्यादी संदेश देणारे ओरेक्‍सिन बंद करण्याचा संदेश मिळतो.

लेट्युस – लेट्युसमध्ये लॅक्‍टेकॅरियम नावाचे गुंगी आणणारे घटक असतात. त्यामुळे लेट्युसचा सॅलडमध्ये समावेश करण्याऐवजी त्याची चार-पाच पाने पाण्यात किमान 15 मिनिटे उकळवावीत. त्यात दोन पुदिन्याच्या पानांच्या काड्या घालून ती दोन मिनिटांनी बाहेर काढावीत. हे पेय रात्री झोपण्यापूर्वी घ्यावं. सुंदर झोप लागते.

भात – आतापर्यंत तुम्ही तांदूळ तुमच्या आरोग्यासाठी कसा चांगला नाही, हे ऐकलं असेल, पण त्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते हे तुम्हाला माहीत आहे का? याचा ग्लायसेमिक इंडेक्‍स उच्च असल्यामुळे झोप लागण्यासाठी जाणारा वेळ कमी होतो. वैद्यकीय पोषणतत्वांनुसार जास्मिन तांदळापासून बनवलेला भात खाणाऱ्या लोकांना इतरांच्या तुलनेत लवकर झोप लागते.

सीरियल – सकाळी सीरियल खाण्यापेक्षा झोपण्याआधी खा. नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या सूचनेनुसार वाटीभर आवडते सीरियल्स खाल्ल्यानं त्यातील दोन घटकांचा जादूई परिणाम होतो. सीरियल्समधून मिळणारे कार्बोहायड्रेट्‌स आणि दुधातून मिळणारं कॅल्शियम. तेव्हा झोप लागत नसेल किंवा रात्रीतून बऱ्याचदा जाग येत असेल, तर हे खाद्यपदार्थ घरात असतील याची काळजी घ्या आणि खात्री बाळगा की, आज ना उद्या तुम्हाला लहान बाळाप्रमाणे गाढ झोप लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)