जाणून घ्या… आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

मुंबई:

  • जलपरिसंस्थेच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय योजना
  • महानिर्मितीच्या कोराडी तलाव संवर्धनास मान्यता

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून जलपरिसंस्थेच्या संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय योजनेंतर्गत (National Plan for Conservation of Aquatic Eco-systems- NPCA) नागपूर जवळील महानिर्मितीच्या (महाजेनको) कोराडी तलावाचे संवर्धन करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शहरी व निमशहरी भागातील तलावांच्या संवर्धनासह प्रदूषित तलावांचे व्यवस्थापन करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे.

तलावांचे शाश्वत व्यवस्थापन व संवर्धन करण्यास राज्य शासनास प्रोत्साहित व मदत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या खर्चात केंद्रीय पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालय आणि महानिर्मितीचा वाटा 60:40 असा राहणार आहे. या योजनेत तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना, सांडपाणी व्यवस्थापन,  तलावांचे योग्य व्यवस्थापन, तलावांच्या परिसरात वृक्षारोपण, बांध मजबुतीकरण, तलावाच्या प्रथमदर्शनी भागासह सार्वजनिक जागांचा विकास, जलजागृतीसाठी उपक्रमांचे आयोजन आदींचा समावेश आहे.

या योजनेंतर्गत एकूण 26 कोटी 21 लाखाचा भार केंद्र सरकार उचलणार असून त्यापैकी 8 कोटी 74 लाख 39 हजार 600 रुपयांचा पहिला हप्ता राज्यास वितरित केला आहे. तसेच महानिर्मिती कंपनीच्या 17 कोटी 48 लाख रुपयांच्या हिश्शातील तीन कोटी 49 लाख 75 हजार 840 रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यासही आज मान्यता देण्यात आली.

  • जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासह विविध पदे
  • लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळली

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व विशेषज्ज्ञ संवर्गातील 17 विविध पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळण्यात आली आहेत. पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी ही पदे स्वतंत्र निवड मंडळाद्वारे भरण्यात येणार आहेत.

राज्यात प्रभावी आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. याअंतर्गतच वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यासह वेतनश्रेणी 15600-39100 ग्रेड पे 6600 मधील  विविध 17 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून तीन वर्षासाठी वगळण्यात आली आहेत. तीन वर्षानंतर ही पदे पूर्ववत आयोगाच्या कार्यकक्षेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. या पदांच्या निवडीसाठी स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ज्या पदांच्या भरती प्रक्रिया सुरु असतील ती पदे वगळून उर्वरित पदे नवीन मंडळामार्फत भरण्यात येणार आहेत.

  • अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द
  • मूल्यवर्धित कर अधिनियमात
  • व्यापार सुलभतेसाठी सुधारणा

व्यापार सुलभता धोरणांतर्गत महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम-2002 नुसार ऐच्छिक नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द करण्यासाठी अधिनियमामध्ये तांत्रिक सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

  • कुकडी पाटबंधारे प्रकल्पास 
  • तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता

पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील 7 दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी 3 हजार 948 कोटी 17 लाख रुपये खर्चाच्या तृतीय सुधारित प्रशासकीय प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

  • कारंजा रमजानपूर प्रकल्पास
  • सुधारित प्रशासकीय मान्यता

अकोला जिल्ह्याच्या खारपाण पट्ट्यातील कारंजा रमजानपूर (संग्राहक) बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या 211 कोटी 15 लाख रुपयांच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याच्या 6 गावांतील 1790 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

  • पूर्णा बॅरेज-2 प्रकल्पाच्या
  • 888 कोटी खर्चास मान्यता

अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील पूर्णा बॅरेज-2 (नेर धामणा) मध्यम प्रकल्पाच्या 888 कोटी 81 लाख रुपये खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे आत्महत्याग्रस्त अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा आणि बाळापूर तालुक्यातील 32 गावांतील 6954 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)