जाणून घेऊयात महात्मा फुले वाडा…

विदयेविना मती गेली ! मतिविना नीती गेली… या कवितेतून महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांनी शिक्षणाचे महत्व त्या काळात पटवून दिले . स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या म. फुले यांनी शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्यांची मांडणी केली . अशा या थोर समाजसुधारकाचा वाडा पुण्यातील जुन्या गंज पेठेत व नव्या महात्मा फुले पेठेत आहे . या वाड्यामुळे पुण्याच्या ऐतिहासिक श्रीमंतीत भर पडली आहे.

महात्मा फुले यांचे या वाड्यात साधारण 1827 ते 1890 दरम्यान वास्तव्य होते. रेखीव असा हा कौलारू वाडा शेणामातीने सारवलेला असा प्रशस्त आहे . हवेशीर खोल्या , ओसरी तसेच अंगणात एक विहीर आहे . ज्योतिबांनी अस्पृश्‍यांसाठी खुली केलेली हीच ती विहीर . वाडयात एकूण तीन दालने आहेत . वाडयात शिरताना एक सुबक तुळशीवृंदावन लागते . 29 नोव्हेंबर 1890 रोजी म. फुले यांचे येथे निधन झाले . “”आपल्या शवास दहन करू नये , तर मिठात घालून पुरावे” अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी शेवटच्या आजारपणात घरामागे खड्डाही खणून घेतला होता. तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांनी हे सर्व अमान्य केलं. नाईलाजास्तव त्यांचे दहन करून 30 नोव्हेंबर 1890 रोजी सावित्रीबाईंनी त्यांच्या पवित्र अस्थी या वाडयात आणल्या. येथील तुळशीवृंदावन व तेथील पादुका ही म. फुले यांची समाधी. त्या समाधीचे दर्शन घेऊन आपण वाडयात शिरतो.

या स्मारक संग्रहालयात म. फुले यांचा जीवनपट चित्रकार वसंत आठवले यांनी रेखाटलेल्या चित्रांतून साकार केला आहे. त्यांचे शिक्षण, विवाह, स्त्रियांची शाळा, सभेत भाषण करताना असे अनेक प्रसंग माहितीसकट जाणून घेता येतात शिवाय महात्मा फुले यांचे एका दालनात मोठे पूर्णाकृती तैलचित्र लावले आहे. म. जोतिबा फुले यांच्या सहकाऱ्यांची देखील चित्रे पाहायला मिळतात. विशेष बाब म्हणजे येथे आपल्याला म. फुले यांचे मृत्युपत्र बघायला मिळते.
समताभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रसिद्ध वाडयाच्या आवारात सावित्रीबाई व महात्मा फुले यादोहोंचे पुतळे बसविले आहेत. अशा या थोर समाजसुधारकाने जिथे निवास केला व अखेरचा श्वास घेतला, तो वाडा एकदा जरूर पहावा.

सुप्रसाद पुराणिक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)