जाणिवांचा बाप्पा – बालपण जपणारे श्री गणेश मित्र मंडळ

पिंपरी – तंत्रज्ञानामुळे वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये हरविलेल्या बालपणाला मैदानात आणून मैदानी खेळ, जुनी मराठमोळी बालगीते, पर्यावरणाचे धडे शिकविण्याचा आगळा वेगळा उपक्रम कासारवाडीचे श्री गणेश मित्र मंडळ राबवत आहेत. फक्‍त गणपती बसवायचा आणि तेवढेच दहा दिवस वेगवेगळे उपक्रम राबवायचे असे न करता कासारवाडीच्या शास्त्रीनगर येथील या मंडळाने स्थानिक नागरिकांच्या मुलांसाठी वर्षभर वेगवेगळे उपक्रम आखून ठेवले आहेत.

श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बालभवन प्रकल्पाचे सर्वच स्तरातून कौतुक झालेले असून फोर्ब्स मार्शल कंपनी सहाय्य करत आहे. सध्या बालभवन प्रकल्पामध्ये एकूण 55 ते 60 मुले-मुली आहेत. मुलांना सहलीला नेतानाही शेती, दुग्धपालन, नर्सरी अशा ठिकाणची माहिती मिळावी असे आयोजन केले जाते. तर दुसऱ्या सहलीमध्ये मुलांना साहसिक खेळ खेळता यावे असा प्रयत्न केला जातो.

याव्यतिरिक्‍त मंडळाने वारकऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था ही केली आहे. देहूहून तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी साताऱ्याहून येणाऱ्या दोन दिंड्या कासारवाडीतच मुक्‍कामाला असतात. मंडळाच्या वतीने या दोन्ही दिंड्यांतील वारकऱ्यांची भोजन आणि विश्रामाची सर्व व्यवस्था केली जाते. मंडळाचे हे कार्य पाहून आता काही प्रतिष्ठित या कार्यात मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. मंडळाची विसर्जन मिरवणूक देखील खूपच पारंपारिक असते. डीजे आणि दुसऱ्या धांगडधिंग्याला फाटा देत मंडळ ढोल-ताशाच्या गजरात शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध अशी मिरवणूक काढते. यंदा मंडळाने स्वत:च्याच कार्यकर्त्यांचे ढोल-ताशा पथक तयार केले आहे.

मंडळाचे यंदाचे 30 वे वर्ष असून अध्यक्ष भरत मोरे, उपाध्यक्ष सुजित शिंदे, कार्याध्यक्ष सचिन साळवी, सचिव सतिश बाळाराम नाचरे, खजिनदार शुभम नायकोडी, उपसचिव ऋतिक गायकवाड, उपकार्याध्यक्ष शिवशंकर कलशेट्‌टी, भरत आनुजे, प्रसाद काणेकर, मुबीन शेख, प्रतिक काणेकर, रितेश जाधव यांसह मंडळाचे सर्व सभासद या उपक्रमांमध्ये सहभागी होतात.

सणांना पर्यावरणाशी जोडण्याचे कार्य
मंडळाच्या वतीने आगळे-वेगळे रक्षाबंधन ही साजरे करण्यात येते. मुले राख्या झाडांना बांधून वृक्षसंवर्धनाचा संकल्प घेतात. आपल्या सणांना पर्यावरणाशी जोडण्याचे काम मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. गणेशोत्सव पूर्वी मंडळाचे कार्यकर्ते शाडूची माती घेऊन येतात आणि मूर्तीकारांच्या मदतीने मुलांना शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी दहीहंडीच्या दिवशी पुस्तक दहीहंडीचे आयोजन केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)