पिंपरी-निगडी येथील महापालिकेची मुले व मुलींच्या स्वतंत्र शाळा भरत होत्या. या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अधिक असतानाही त्या एकत्रित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सध्या वर्गात बसण्यासाठी विद्यार्थ्यांना जागा अपुरी पडत असल्याने यंदाच्या वर्षापासून शंभरहून अधिक विद्यार्थीनींनी शाळा सोडली असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते सचिन चिखले यांनी केला आहे. चिखले यांनी याबाबत मनपा आयुक्‍त श्रावण हर्डीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त प्रवीण आष्टीकर आणि शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांनी एक निवेदन दिले आहे. जागा अपुरी पडत असल्यामुळे होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन पूर्वीप्रमाणे सकाळ व दुपारच्या सत्रात दोन्ही शाळा भराव्यात, अशी मागणी चिखले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निगडी येथील दोन्ही शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या संख्या जास्त आहे. एक वर्षापूर्वी मुले व मुलींची शाळा दोन सत्रात भरत होत्या. अचानक दोन्ही शाळा एकत्रित करण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. तसेच, अनेक विद्यार्थीनींची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही शाळा एकत्रित करताना कोणालाही विश्‍वासात घेतले नाही. तसेच, विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने बसण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. जागेअभावी विद्यार्थ्यीची हेळसांड होत असल्याचे दिसत आहे. सध्या शाळेत पाचशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून मुले व मुलींची एकत्रित 11 ते 5 या वेळेत शाळा भरत आहे. दोन्ही शाळा एकत्रित बसत असल्याने शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना शिकविताना अडचण निर्माण होत आहे. यामुळे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत, विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी एकत्रित येऊन स्वतंत्र वर्ग तयार करण्याबाबत चर्चा करण्याची गरज असल्याचे चिखले यांनी सांगितले.

एक वर्षापूर्वी या दोन्ही शाळा एकत्रित करण्यात आलेल्या आहेत. यामुळे, विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शिक्षण समितीच्या येणाऱ्या बैठकीत चर्चा करुन हा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत.
                                                                            सोनाली गव्हाणे, अध्यक्ष, शिक्षण समिती मनपा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)