जागतिक विनोद पटलाचा महानायक – चार्ली चॅप्लिन 

किरण दीक्षित 

एखाद्याला रडवणे सहज शक्‍य असते परंतु, एखाद्याला हसवण्यासाठी धडपड करणारे फार कमी असतात…दुसऱ्याच्या आयुष्यातील दु:ख, ताण काही काळासाठी किंवा कायमचे घालवण्यासाठी आपल्या विनोद बुद्धीचा वापर करणारे लोक आठवायचे म्हटलं तर त्यांची संख्या तुरळकच म्हणावी लागेल. परंतु, आपल्या विनोद कौशल्याचा वापर करून आपल्या आयुष्यातील दु:खांनादेखील विनोदीची जोड देणारेच या जगाच्या रंगमंचावर विनोदवीर म्हणून ओळखले जातात.


‘विनोदवीर’ हा शब्द उच्चारला तरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो बुटकासा…गोल डोळ्याचा…ओठांवर छोटीशी मिशी …आखुड काळी पॅंट आणि कोट..डोक्‍यावर गोल हॅट घालणारा… हातात काठी फिरवत आणि सैरभैर नजर घेवून आपल्या निखळ अभिनयाने सर्वांच्या आयुष्यात आंनद पसरवणारा चार्ली चॅप्लिन…

चार्ली चॅप्लिनने त्याच्या चित्रपटांमधून आपल्या अबोल अशा अभिनयातून आपल्याला डोळ्यात पाणी येईपर्यंत हसायला भाग पाडले. परंतु,हसण्याबरोबरच माणसाच्या आयुष्यातले काही सत्य पैलु सर्वांच्या समोर ठेवुन त्याने डोळ्यात टचकन्‌ पाणी आणून रडवले देखील. त्याचा अभिनय हा कोणत्या अभिनयाच्या महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेतलेले नव्हते तर त्याचे आयुष्यच अभिनयाचे महाविद्यालय होते. या महाविद्यालयातील त्याची गुरू म्हणजे त्याची आई ठरली. त्यांच्या प्रत्येक विनोदात त्यांच्या आईची शिकवण त्याला साक्ष देत होती.

चार्लीचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी लंडन इथे झाला. त्याच्या जन्माच्या वेळी ते दोघेही ऑपेराचे गायक होते, परंतु कालांतराने ते विभक्त झाले. त्यानंतर आपले आणि आपल्या मुलांची पोटे भरण्याची तिची धडपड चार्लीच्या आयुष्याला वेगळे वळण देवून गेली. दरम्यान, पडद्यावरच्या चार्लीचे आगळेवेगळे रूप होते, एक टाइट कोट, बॅगी पॅन्ट, छोटी हॅट आणि मोठे शूज, आणि हो, चेहऱ्यावरची त्याची ती छोटीशी मिशी. त्याने त्याचे हे रूप मुद्दाम घेतले होते. आणि त्यावेळी चार्लीने घेतलेले रूप हे आजपर्यंत त्याच्याच नावाने प्रसिद्ध आहे.

1895 ते 1976 दरम्यान, या कलाकाराने आपल्या मुकपटाच्या माध्यमातून जगावर आपली छाप पाडली. त्याने आपल्या सिनेमात अभिनय तर केलाच त्याचबरोबर दिग्दर्शन, पटकथा आणि संगितसुद्धा दिले. लोकांना एकही शब्द न बोलता खळखळून हसवण्याची कला त्याने अवगत केली होती. अभिनय आणि मुकविनोदाने प्रेक्षक, चाहत्यांच्या आयुष्यात आनंद पसरवण्यात चार्लीची 75 वर्षे निघून गेली. 1915 मध्ये विश्‍व युद्धाच्या कठीण काळातदेखील चार्लीने आपले काम सतत सुरू ठेवले आणि लोकांना मनसोक्‍त हसवले. त्यानंतर 25 वर्षानंतर महामंदी आणि हिटलरच्या काळात देखील त्याने लोकांना खळखळून हसण्यास भाग पाडले. हॉलिवुडमध्ये चार्ली चॅप्लिनचे बोलते चित्रपट आले. 1940 मध्ये द ग्रेट डिक्‍टेटर, लाइमलाइट आणि मोसिओर वरडॉक्‍स हे तिन चित्रपट प्रसिद्ध झाले होते.चार्लीचा धीस इज माय सॉंग हा एक चित्रपट वेगळ्या भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता.

1910 ते 1920 या काळात चार्ली चॅप्लिन हा जगप्रसिद्ध कलाकार म्हणून नावारूपाला आला होता. अ काऊंटेस फ्रॉम हॉंगकॉंग हा त्याचा प्रथमश्रेणीतील चित्रपट होता. दरम्यान, 1972 मध्ये त्याला अकादमीचा पुरस्कारदेखील प्राप्त झाला होता. त्याच्या संपुर्ण आयुष्यात त्याला तीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याच्या आयुष्यात सामाजिक जीवनातील अतिप्रशंसा आणि विवाद हा त्याच्या शेवटपर्यंत चर्चेचा विषय होता. 1964 मध्ये त्याने आपले आत्मचरित्र प्रकाशित केले होते. वयाच्या 88 व्या वर्षापर्यंत चार्लीने हसवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले. 25 डिसेंबर 1977 रोजी या हास्याच्या बादशाहने जगाचा निरोप घेतला. मात्र, ज्याचे नाव जरी घेतले तर कोणाच्याही चेहऱ्यावर हलकेसे हास्य येते हेच चार्लीच्या आयुष्यभराच्या कामाचे फळ मानायला हवे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)