जागतिक बाजारातील सकारात्मक संदेशाने शेअर निर्देशांकांत वाढ 

मुंबई – जागतिक बाजारातून मंगळवारी सकारात्मक संदेश आले. त्यामुळे भारतीय शेअरबाजारातही खरेदी होउन निर्देशांकांत वाढ झाली. आता निर्देशांक चार महिन्याच्या उचांकी पातळीवर गेले आहेत. अमेरिका आणि उत्तर कोरिया दरम्यानची बोलणी यशस्वीरीत्या सुरू झाल्यामुळे जागतिक शेअरबाजारात आज खरेदी होऊन निर्देशांकांत वाढ झाल्याचे दिसून आले. बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 209 अंकांनी वाढून 35692 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 55 अंकांनी वाढून 10842 अंकावर बंद झाला. निफ्टी 10800 या महत्त्वाच्या पातळीवर बंद झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले. लवकरच औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्याबबत आशावादी असलेल्या गुंतवणूकदारांनी खरेदी केली.

काल झालेल्या व्यवहाराबाबत शेअरबाजारानी जारी केलेल्या माहितीनुसार काल देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1062 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली तर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 1156 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. दरम्यान डी मार्टची पालक कंपनी अव्हेन्यू सुपरमार्टसचे बाजारमूल्य आता 1 लाख कोटीवर पोहोचले. बीएसईमधील सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांत लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असणाऱ्या गटात कंपनीचा सहभाग झाला. कंपनीचा समभाग 1,619 या सार्वकालिक उच्चांकावर गेल्याने बाजारमूल्य 1,00,320 कोटी रुपयांवर पोहोचले होते. गेल्या तीन आठवड्यात समभागात 19 टक्‍क्‍यांपर्यंत तेजी आली असून चालू वर्षात तो 34 टक्‍क्‍यांनी वधारला. मार्च 2017 मध्ये ऑफर किंमत 299 रुपये असणाऱ्या समभागात 744 टक्‍क्‍यांची वाढ झाली. प्रवर्तक राधाकिशन दमानी यांनी आपल्याकडील 6.2 दशलक्ष म्हणजेच 1 टक्‍का समभागांची विक्री केल्याची माहिती कंपनीकडून एक्‍स्चेंजला देण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने डी मार्टची 24 दुकाने उघडली असून व्यवस्थापनाच्या 30 या लक्ष्यापेक्षा कमीच आहेत. आगामी काळातही या कंपनीच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

उत्तर कोरिया आणि अमेरिकेदरम्यान तणाव कमी झाल्यानंतर जागतिक शेअरबाजारात उमेदीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे भारतीय शेअरबाजारातही खरेदी झाली. मात्र, आगामी काळात फेडरल रिझर्व्हचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्याचबरोबर भारतातील स्थूल अर्थव्यवस्थेची आकडेवारी जाहीर होणार आहे. याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहील.
विनोद नायर, संशोधन प्रमुख, जीओजी वित्तीय सेवा 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)