सांघिक गटात रौप्य, चीमाला कांस्य

चांगवेन: आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नेमबाज सौरभ चौधरीने आज विश्‍वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदकाची कमाई करून येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी असलेल्या सौरभने ज्युनिअर गटातील 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात सुवर्णपदक पटकावताना गेल्या वर्षी जून महिन्यात प्रस्थापित केलेला स्वतःचाच विश्‍वविक्रम मोडीत काढला.

केवळ 16 वर्षीय सौरभने पात्रता फेरीत 581 गुणांची कमाई करताना अंतिम फेरीत आपले स्थान निश्‍चित केले होते. त्यानंतर अंतिम फेरीत पहिल्या प्रयत्नापासूनच सौरभने आघाडी कायम राखत सुवर्णपदकाच्या दिशेने आगेकूच सुरू केली. सुवर्णपदकासाठी सौरभसमोर कोरियाच्या होजिन लिमचे आव्हान होते. मात्र शेवटच्या प्रयत्नानंतर होजिनच्या खात्यात केवळ 243.1 गुण जमा झाले आणि सौरभने विश्वविक्रमी कामगिरी करताना 245.5 गुणांसह सुवर्णपदक आपल्या नावे केले.

भारताचा युवा नेमबाज अर्जुन सिंग चीमाने 218 गुणांची कमाई करताना कांस्यपदक पटकावले. तर कोरियाच्या होजिन लिमने 243.1 गुणांसह रौप्यपदक आपल्या नावे केले. तसेच ज्युनियर गटाच्या 10 मीटर एअर पिस्तोल सांघिक स्पर्धेत भारतीय संघाने रौप्यपदकाची कमाई करताना तिहेरी यश संपादन केले. सौरभ चौधरीने अर्जुन सिंग चीमा आणि अनमोल या आपल्या सहकाऱ्यांसह सांघिक प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. या तिघांनी मिळून 1730 गुणांची नोंद केली.

कोरियन संघाने 1732 गुणांची नोंद करताना नव्या विश्‍वविक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. तर रशियन संघाने 1711 गुणांची कमाई करताना कांस्यपदकाची निश्‍चिती केली. आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर लागोपाठ दुसऱ्या मोठ्या स्पर्धेत मिळवलेल्या पदकामुळे सौरभ चौधरीकडून भारताच्या आशा वाढल्या आहेत. अंतिम फेरीत अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीतही त्याने कमालीचा संयम राखताना सुवर्णपदक पटकावलेच, शिवाय विश्‍वविक्रमाची नोंद करताना आपली परिपक्‍वता दाखवून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)