जागतिक नेमबाजी अजिंक्‍यपद स्पर्धा: भारताला सांघिक रौप्य व वैयक्‍तिक कांस्यपदक

संग्रहित फोटो

चॅंगवॉन: भारताच्या ज्युनियर खेळाडूंनी मंगळवारी पुरुषांच्या सांघिक स्कीट प्रकारात रौप्य, तर वैयक्‍तिक स्कीट प्रकारात कांस्यपदकाची कमाई करताना येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्‍यपद नेमबाजी स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. आतापर्यंत या स्पर्धेत भारताच्या खात्यात 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 7 कांस्य अशी एकूण 22 पदके जमा झाली आहेत.

गुरनिहाल (119), अनंतजित सिंग नरुका (117) आणि आयुष रुद्रराजू (119) यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने 355 गुणांसह दुसरे स्थान राखत भारताच्या खात्यात रौप्यपदकाची भर घातली. त्याआधी सोमवारी झालेल्या पात्रता फेरीत भारतीय संघाने अव्वल स्थान मिळवले होते. या गटात चेक प्रजासत्ताकाने ( 356) अवघ्या एका गुणाच्या फरकाने सुवर्णपदक जिंकले, तर इटलीला 354 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

याशिवाय अन्य प्रकारांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंनी निराशा केली. वैयक्‍तिक स्कीट प्रकारात गुरनिहालला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने 46 गुणांची कमाई केली. या गटात इटलीच्या एलिया स्क्रुचिओलीने (55) सुवर्ण आणि अमेरिकेच्या निक मोश्‍केटीने (54) रौप्यपदक जिंकले. तत्पूर्वी, ज्युनियर वैयक्‍तिक स्कीट प्रकारातील पात्रता फेरीत गुरनिहालसिंगने 75 पैकी 73 गुण मिळवून दुसरे स्थान मिळवले होते.

याच गटांत अनंतजितसिंग नरुकाने 71 गुणांसह अकरावे, तर आयुश रुद्रराजूने 70 गुणांसह बारावे स्थान मिळवले होते. तिघांच्या गुणांची बेरीज 214 झाल्यामुळे सांघिक पात्रता फेरीत या त्रिकुटाने अव्वल स्थान पटकावताना सायप्रसच्या संघापेक्षा एक गुण अधिक मिळवला होता. महिलांच्या स्कीट स्पर्धेत रश्‍मी राठोड (108), माहेश्‍वरी चौहान (106) आणि गनेमत सेखोन (105) या भारतीयांना वैयक्‍तिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठता आली नाही. तसेच सांघिक स्पर्धेत त्यांची नवव्या स्थानावर घसरगुंडी झाली.

ज्युनियर गटातील पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरने 1155 गुणांसह अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत 431.7 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिल्याने त्याचे पदक हुकले. दुसरीकडे पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात अनिश भानवाला याला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. अनिशने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असल्यामुळे या प्रकारात त्याच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात होती.

आतापर्यंत या स्पर्धेमधून भारताच्या दोन खेळाडूंनी ऑलिम्पिक पात्रतेचा कोटा मिळाला आहे. अपूर्वी चांडेला आणि अंजुम मौदगिल या दोनच खेळाड़ू 2020 टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. यानंतर काही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, मात्र ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणे त्यांना जमले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)