जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धा : झुंजार पुनरागमनासाठी नीरज चोप्रा सज्ज

लंडन – भारताचा गुणवान युवा भालाफेकपटू नीरज चोप्रा अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही, त्यामुळे कोट्यवधी भारतीय क्रीडाशौकिनांची निराशा झाली. परंतु नीरजलाही आपल्या पराभवाची पुरेपूर जाणीव झाली आहे. आपली नक्‍की काय चूक झाली हे त्याला अद्यापही माहीत नसले, तरी आपल्या फेकीच्या शैलीत निर्माण झालेल्या तांत्रिक त्रुटी दूर करून लवकरच जोरदार पुनरागमन करण्याची ग्वाही नीरजने दिली आहे. मला फेकीचे तंत्र सुधारण्यासाठी आणि त्यात बिनचूकपणा आणण्यासाठी काही काळ लागेल, परंतु मी निश्‍चितच जोरदार पुनरागमन करेन, असेही त्याने म्हटले आहे.

कोणत्याही प्रशिक्षकाविनाच जागतिक स्पर्धेत उतरलेल्या नीरजसाठी हे आव्हान सोपे नव्हतेच. भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने नीरजची ज्युनियर गटातील विक्रमी कामगिरी ध्यानात घेऊन त्याच्यासाठी प्रशिक्षक म्हणून जर्मनीचे उवे हॉन यांची नेमणूक केली होती. मात्र या सगळ्याला खूपच उशीर झाला होता. त्यातच उवे हॉन यांचा ऑस्ट्रेलियन संघाशी असलेला करार जागतिक स्पर्धेनंतरच संपणार असल्याने ते त्याआधी नीरजला उपलब्धच होऊ शकले नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेणेही त्याला शक्‍य झाले नाही. तो एकट्यानेच सराव करीत राहिला. जागतिक स्पर्धेसाठी त्याची ही तयारी पुरेशी ठरली नाही, यात आश्‍चर्य नव्हते. या सगळ्याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला व 83 मीटरची पात्रता कामगिरी गाठण्यातही तो अपयशी ठरला.

वास्तविक पाहता नीरज चोप्राची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी 85.63 मीटर अशी होती. तसेच नीरजची सर्वोत्तम वैयक्‍तिक कामगिरी 86.48 मीटर अशी असल्यामुळे त्याच्याकडून खूपच चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु त्याला पहिल्या प्रयत्नात 82.26 मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी करता आली. दुसरा प्रयत्न वाया गेल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नातही नीरजला केवळ 80.54 मीटर फेक करता आल्यामुळे तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.

या सगळ्याची जबाबदारी कोणाची, याबाबतही चर्चा होण्याची गरज आहे. त्याउलट कोणतीही अपेक्षा नसलेल्या भारताच्या देविंदर सिंग कांगने पुरुषांच्या भालाफेकीत अंतिम फेरी गाठताना ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. भालाफेक प्रकारात अंतिम फेरी गाठणारा देविंदर सिंग हा पहिलाच भारतीय ठरला. देविंदर सिंग कांग जूनमध्ये घेण्यात आलेल्या उत्तेजक सेवन चाचणीत दोषी ठरला होता. माज्ञ तांत्रिक मुद्‌द्‌याच्या आधारे महासंघाने त्याला जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यास परवानगी दिली होती. त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेत संस्मरणीय कामगिरी केली. देविंदरने 84.22 मीटर फेक केली. जर्मनीच्या जोहानस व्हेटरने 91.20 मीटर भालाफेक करताना जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेच्या 34 वर्षांच्या इतिहासातील प्राथमिक फेरीतील सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे भारतीय खेळाडूंना किती मजल मारायची आहे, याचा अंदाज येऊ शकेल.

दरम्यान जागतिक स्पर्धेत दुती चंद (100 मीटर), मुहम्मद याह्या (400 मी.) आणि सिद्धांत थिंगालिया (110 मी. अडथळा) या अन्य तीन भारतीय ऍथलीट्‌सनीही भाग घेतला. परंतु अत्यंत निराशाजनक कामगिरीमुळे हे तिघेही पहिल्याच फेरीत बाहेर फेकले गेले. निर्मला शेवरानने 400 मी. शर्यतीत उपान्त्य फेरी गाठली. तर अनू राणीने महिलांच्या भालाफेकीत अंतिम फेरी गाठली. पुरुष व महिला मॅरेथॉनमध्ये टी. गोपी व मोनिका आठरे यांना 28 व 64व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत भारताचा लक्ष्मणन 26व्या क्रमांकावर राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)