जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धा – पॉवेल फॅडेकचे तिसरे सुवर्णपदक

फॅडेकने केली ऑलिम्पिक पराभवाची भरपाई

लंडन – जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेचा आठवा दिवसही सनसनाटी निकालांमुळे खळबळजनक ठरला. एका बाजूला महिलांच्या 200 मीटर शर्यतीत डेफनी शीपर्स, पुरुषांच्या हातोडाफेकीत पॉवेल फॅडेक आणि महिलांच्या लांब उडीत ब्रिटनी रीज हे दिग्गज ऍथलीट आपापल्या प्रकारांवर वर्चस्व गाजवीत सुवर्णपदकाला गवसणी घालीत असताना महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये एम्मा कोबर्न आणि कोर्टनी फ्रेरिक्‍स यांनी आश्‍चर्यकारक कामगिरी बजावताना आजच्या दिवसावर वर्चस्व गाजविले.

पोलंडच्या पॉवेल फॅडेकने पुरुषांच्या हातोडाफेक प्रकारात गतविजेतेपद राखताना सलग तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई करीत आपले प्रभुत्व दाखवून दिले. पॉवेल फॅडेकने 79.81 मीटर हातोडाफेक करीत अन्य प्रतिस्पर्ध्यांना सहज मागे टाकले. स्वतंत्र प्रवेशिका भरणाऱ्या रशियाच्या व्हॅलेरी प्रॉनकिनने 78.16 मीटर फेक करताना रौप्यपदक पटकावले. तर पोलंडच्याच वोसिएच नोविकीने 78.03 मीटर फेक करताना कांस्यपदकाची निश्‍चिती केली.

याआधीच्या दोन्ही जागतिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या फॅडेकला लंडन 2012 आणि रिओ 2016 अशा दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यात मात्र अपयश आले होते. परंतु या वेळी त्याने आपण जगात सर्वोत्तम असल्याचे सिद्ध करून दाखविले. मी या क्षणासाठी गेल्या पाच वर्षांपासून प्रतीक्षा करीत होतो, असे सांगून फॅडेक म्हणाला की, माझे महानपण मान्य करण्यासाठी सलग तीन जगज्जेतेपदांपेक्षा त्यांना आणखी काय पाहिजे आहे? होय, मी इतिहास घडविला आहे आणि मला त्याचा अभिमान वाटतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)