जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धा – ब्रिटनी रीजचे चौथे सुवर्णपदक

क्‍वीन शीपर्सने राखले 200 मीटरचे जगज्जेतेपद

स्टीपलचेजमध्ये एम्मा कोबर्न, कोर्टनी फ्रेरिक्‍स यांची आश्‍चर्यकारक कामगिरी

लंडन – जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेचा आठवा दिवसही सनसनाटी निकालांमुळे खळबळजनक ठरला. एका बाजूला महिलांच्या 200 मीटर शर्यतीत डेफनी शीपर्स, पुरुषांच्या हातोडाफेकीत पॉवेल फॅडेक आणि महिलांच्या लांब उडीत ब्रिटनी रीज हे दिग्गज ऍथलीट आपापल्या प्रकारांवर वर्चस्व गाजवीत सुवर्णपदकाला गवसणी घालीत असताना महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये एम्मा कोबर्न आणि कोर्टनी फ्रेरिक्‍स यांनी आश्‍चर्यकारक कामगिरी बजावताना आजच्या दिवसावर वर्चस्व गाजविले.

आठव्या दिवसातील सर्वात भावनिक विजयाची नोंद करताना अमेरिकेच्या ब्रिटनी रीजने महिलांच्या लांब उडीत तब्बल चौथ्या सुवर्णपदकाची कमाई केली. चार वेळा एकाच प्रकारात जगज्जेतेपद पटकावणाऱ्या ब्रिटनी रीजने अमेरिकेचा ड्‌वाईट फिलिप्स आणि क्‍यूबाचा इव्हान पेड्रोसो या पुरुष लांब उडीपटूंच्या चार जागतिक सुवर्णांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. मात्र ब्रिटनीच्या या विजयाला भावनिक किनार होती. तिच्यावर निरतिशय प्रेम करणाऱ्या तिच्या आजोबांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. ते दुख बाजूला ठेवून जागतिक स्पर्धेसाठी तिने कसून तयारीही केली होती. अंतिम फेरीपूर्वी तिने आपल्या बिबच्या आतील बाजूला “पॉ पॉ’असे आपल्या आजोबांचे टोपणनावही लिहिले होते.

तिसऱ्या प्रयत्नात 7.02 मीटर उडी घेत सुवर्णपदकाची निश्‍चिती केल्यावर तिने प्रेक्षक व पत्रकारांना हा बिब दाखवीत आपले सुवर्णपदक आजोबांना अर्पण केल्याचे सांगितले. आपलीच सहकारी अमेरिकेची तियाना बार्टोलेटाकडून रिओ ऑलिम्पिकमध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवाची ब्रिटनीने आज परतफेड केली. बार्टोलेटाला आज 6.97 मीटर अशा निराशाजनक कामगिरीमुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तर रशियावरील बंदीमुळे स्वतंत्र प्रवेशिका भरलेल्या दारिया क्‍लिशिनाने 7.00 मीटर उडी घेताना रौप्यपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)