जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धा – स्टीपलचेजमध्ये एम्मा कोबर्न आश्‍चर्यकारक कामगिरी

क्‍वीन शीपर्सने राखले 200 मीटरचे जगज्जेतेपद

लंडन – जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेचा आठवा दिवसही सनसनाटी निकालांमुळे खळबळजनक ठरला. एका बाजूला महिलांच्या 200 मीटर शर्यतीत डेफनी शीपर्स, पुरुषांच्या हातोडाफेकीत पॉवेल फॅडेक आणि महिलांच्या लांब उडीत ब्रिटनी रीज हे दिग्गज ऍथलीट आपापल्या प्रकारांवर वर्चस्व गाजवीत सुवर्णपदकाला गवसणी घालीत असताना महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये एम्मा कोबर्न आणि कोर्टनी फ्रेरिक्‍स यांनी आश्‍चर्यकारक कामगिरी बजावताना आजच्या दिवसावर वर्चस्व गाजविले.

अमेरिकेची गुणवान युवा धावपटू एम्मा कोबर्नने आपली सहकारी कोर्टनी फ्रेरिक्‍सच्या साथीत आश्‍चर्यकारक कामगिरीची नोंद करताना महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेज प्रकारात खळबळजनक निकालासह सुवर्णपदक पटकावले. गेल्या दोन जागतिक स्पर्धांमध्ये अनुभवाच्या कमतरतेमुळे कोबर्नला अपेक्षित यश मिळविता आले नव्हते. तसेच गेल्याच वर्षी झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही कोबर्नला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्या पराभवाचे शल्य मनात ठेवून या वेळी कोणतीही चूक न करण्याच्या जिद्दीने कोबर्नने धाव घेतली आणि थेट स्पर्धाविक्रमालाच गवसणी घातली.

एम्मा कोबर्नने 09 मिनिटे 02.58 सेकंदांत सुवर्णपदकाची निश्‍चिती करताना अमेरिकेला महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेज शर्यतीत पहिलेवहिले सोनेरी यश मिळवून दिले. सर्वसाधारणपणे केनयाच्या धावपटूंनीच वर्चस्व गाजविलेल्या या प्रकारात अमेरिकेला अखेरचे सुवर्णपदक 1952 हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या स्टीपलचेज शर्यतीत होरेस ऍशेनफेल्टरने मिळवून दिले होते. अमेरिकेच्याच कोर्टनी फ्रेरिक्‍सने 9 मि. 03.77 सेकंद अशा सर्वोत्तम वैयक्‍तिक कामगिरीची नोंद करताना रौप्यपदकाची निश्‍चिती केली. परिणामी केनयाच्या गतविजेत्या आणि ऑलिम्पिक विजेत्या हायविन जेपकेमोईला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जेपकेमोईने 9 मि. 04.03 सेकंद अशी निराशाजनक वेळ दिली. ऑलिम्पिकमधील निराशाजनक कांस्यपदकानंतर या वेळी मी स्वत:च्या क्षमतेवर संपूर्ण विश्‍वास ठेवला आणि मला जगज्जेतेपद मिळविण्याची हीच संधी आहे असे स्वत:ला बजावले, असे कोबर्नने विजयानंतर सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)