जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धा : क्‍वीन शीपर्सने राखले 200 मीटरचे जगज्जेतेपद

पॉवेल फॅडेकचे तिसरे, ब्रिटनी रीजचे चौथे सुवर्णपदक
स्टीपलचेजमध्ये एम्मा कोबर्न, कोर्टनी फ्रेरिक्‍स यांची आश्‍चर्यकारक कामगिरी
लंडन – जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेचा आठवा दिवसही सनसनाटी निकालांमुळे खळबळजनक ठरला. एका बाजूला महिलांच्या 200 मीटर शर्यतीत डेफनी शीपर्स, पुरुषांच्या हातोडाफेकीत पॉवेल फॅडेक आणि महिलांच्या लांब उडीत ब्रिटनी रीज हे दिग्गज ऍथलीट आपापल्या प्रकारांवर वर्चस्व गाजवीत सुवर्णपदकाला गवसणी घालीत असताना महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेजमध्ये एम्मा कोबर्न आणि कोर्टनी फ्रेरिक्‍स यांनी आश्‍चर्यकारक कामगिरी बजावताना आजच्या दिवसावर वर्चस्व गाजविले.

एकंदरीत आजच्या आठव्या दिवसातील निकालांमुळे अनेक गोष्टी सिद्ध झाल्या. एका बाजूला सातत्य आणि खडतर परिश्रमाच्या जोरावर सुमारे दशकभर जागतिक ऍथलेटिक्‍स क्षेत्रावर वर्चस्व राखण्याची करामत करता येते हे सिद्ध करणारे जुने खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला कोवळ्या वयातच आव्हानांवर मात करून जगज्जेतेपदाकडे झेप घेणारे युवा खेळाडू यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. डेफनी शीपर्स, पॉवेल फॅडेक किंवा ब्रिटनी रीज यांच्यासारखे खेळाडू वय हा केवळ एक आकडा असल्याचे दाखवून देतात. तर एम्मा कोबर्नसारख्या खेळाडू गुणवत्तेला परिश्रमांची जोड मिळाल्यास काय चमत्कार घडविता येतो हे सिद्ध करून दाखवितात. तसेच महिलांच्या 100 मीटर अडथळ्याच्या शर्यतीतील विश्‍वविक्रमवीर केन्ड्रा हॅरिसनवर केवळ एका चुकीमुळे स्पर्धेतून बाद होण्याची वेळ आली होती. त्यामुळे जगज्जेत्या किंवा विक्रमवीर खेळाडूंनाही क्षणार्धाची चूकसुद्धा माफ नसते, हे दिसून आले.

डेफनी शीपर्सचा रोमांचकारी विजय
महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत अपेक्षित निकाल लागला असेच म्हणावे लागेल. परंतु ही शर्यत निकालात दिसते तितकी सोपी झाली नाही. गतविजेत्या डेफनी शीपर्सला बहामाच्या शॉन मिलरकडून अंतिम फेरीत कडवी झुंज मिळण्याची खात्री होती. उपान्त्य फेरीत वेगवेगळ्या हीटमध्ये धावणाऱ्या या दोघींनीही 22.49 सेकंद अशी सारखीच वेळ दिली होती. त्या खालोखाल आयव्हरी कोस्टच्या मेरी जोसीने 22.50 सेकंद वेळ दिली होती. त्यामुळे या तिघींमध्येच सुवर्णपदकासाठी चुरस होणार हे निश्‍चित होते. प्रत्यक्षातही तसेच घडले. डेफनी आणि मेरी जोसी यांनी एकाच वेळी अंतिम रेषा ओलांडल्याचे दिसत होते. परंतु डेफनी शीपर्सने आपला अनुभव पणाला लावताना अखेरच्या क्षणी पुढे वाकून झेप घेतली. पंचांनी निकाल जाहीर केला तेव्हा उपस्थितांनी श्‍वास रोखून धरले होते. डेफनी शीपर्सने 22.05 सेकंदांत सुवर्णपदक जिंकल्याचा निकाल पंचांनी दिला खरा. परंतु मेरी जोसी आणि डेफनीच्या वेळेत केवळ तीन शतांश सेकंदांचा फरक असल्याने मेरीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. बहामाच्या शॉन मिलरने 22.15 सेकंदांत अंतिम रेषा ओलांडताना कांस्यपदकाची निश्‍चिती केली. महिलांच्या 100 मीटर शर्यतीत मेरी जोसने रौप्यपदक पतकावताना डेफनीला कांस्यपदकावर ढकलले होते. डेफनीने या वेळी त्या पराभवाची परतफेड केली. 100 मीटरची सुवर्णपदक विजेती टोरी बोवी हिने 200 मीटर शर्यतीत भाग घेतला नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)