जाऊ द्या ना बाळासाहेब..!

सातारा – सातारा विकास आघाडीच्या सुस्तावलेल्या कारभाराला बाळासाहेब खंदारेंनी एक वर्षाच्या कालखंडानंतर धारदारपणे कापायला सुरूवात केली. सत्तेपुढे आणि कायद्यापुढे शहाणपण चालत नसते ही म्हण जरी खरी असली तरी पडद्यामागचे चालणारे गोरखधंदे बाळासाहेबांनी अतिशय मार्मिक शब्दात उघडे केले, आणि साताऱ्याच्या विकासासाठी दोंन्ही राजांनी एकत्र यावे ही माफक अपेक्षा व्यक्‍त करून ताणली गेलेली दुखरी मनोमिलनाची तार छेडली.

मोक्काच्या कारवाईनंतर कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडलेल्या बाळासाहेबांची आक्रमक रणनिती कमी झाली नव्हती पण बाळू खंदारेचा बाळासाहेब खंदारे म्हणण्याइतपत राजकीय समंजसपणा दिसू लागल्याने नगरविकास आघाडी पुन्हा फ्रंटवर येण्याची चिन्हे असून त्याला आता अनुभवी “कदमां’ची गरज आहे. असे घडल्यास “साविआ’ला दुधारी विरोधाचा सामना करावा लागणार आहे. मात्र, सध्यातरी नगरपालिकेच्या कारभारावर “जाऊ द्या ना बाळासाहेब…’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

-Ads-

मल्हार पेठेतल्या गल्लीतच लहानाचा मोठा झालेल्या बाळू खंदारेचा बाळासाहेब खंदारेपर्यंतचा झालेला राजकीय प्रवास अतिशय नाट्यमय घडामोडींनी भरलेला आहे. नगरसेवक पदापासून ते थेट जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदापर्यंत बाळू खंदारे यांची झालेली वाटचाल भल्याभल्यांना अचंबित करणारी ठरली होती. पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या नगरपालिकेतील सभेत त्यांना उघड शब्दात जाब विचारणारे बाळासाहेब खंदारे यांनी नगरपालिकेतल्या विशेषतः सत्ताधाऱ्यांच्या राजकीय उणीवा अलगदपणे पकडत त्याच्यावर विरोधाचा दांडपट्टा आडवा-तिडवा चालवला. मग कृत्रिम तळ्याच्या बिलांचा प्रश्‍न असो, की जगताप कॉलनीतल्या निकृष्ठ दर्जाच्या रस्त्यांचा प्रश्‍न असो, सर्व प्रश्‍नांवर आक्रमकपणे तुटून पडणाऱ्या खंदारेंना आवरणे अशोक मोनेंच्या नाकी नऊ आले होते.

एलईडी बल्ब दिव्याच्या गैरकारभाराचा स्वतःच एलईडी दिवा डोक्‍यावर लावून खंदारे यांनी पालिकेच्या गैरकारभाराचा सर्वसाधारण सभेत चांगलाच उजेड पाडला. त्यामुळे साविआ चांगलीच कातावली. त्यापुढे 2 नोव्हेंबर 2017 ते 28 नोव्हेंबर 2018 या दरम्यान नगरपालिकेच्या 12 सभा झाल्या. त्यातील आठ सभांना खंदारे यांची रजा होती, तर चार सभा ते गैरहजर होते. याच गोष्टीचे भांडवल करून साविआने त्यांना अपात्र करण्याची राजकीय शक्‍कल लढवली. साधारण वर्षभराच्या खंडानंतर बाळासाहेब पुन्हा पालिकेत परतले. आणि त्यांनी तोंड बांधून घेत पुन्हा एकदा स्टंट केला.

मुख्याधिकाऱ्यांच्या राजकीय आजाराचे नक्‍की काय प्रकरण आहे याची खुल्लमखुल्ला मांडणी करून त्यांच्या नावावर तीस चौकशा सुरू असल्यानेच ते नगरपालिकेला तोंड दाखवण्यास घाबरत आहेत. असा खळबळजनक गौप्यस्फोट केला. आता प्रत्यक्षात मुख्याधिकारी गोरे यांच्या कौटूंबिक आजारपणाचे काय राजकारण आहे हे त्यांनाच ठाऊक. मात्र यावर खंदारे यांनी जोरदार टोलेबाजी करत पुन्हा खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मनोमिलनाचे आवाहन केले.

साताऱ्याचा आंतरविरोधाचा राजकीय प्रवास आता दुखऱ्या वळणावर पोहोचला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार गटाला पराभव पत्करावा लागल्याने निर्माण झालेली सल ही खरी अडचण आहे. अशा परिस्थितीत काही ज्येष्ठ नगरसेवकांनी लक्ष्य दिल्यास व दोंन्ही राजांनी पुन्हा ठरवल्यास मनोमिलन करणे अवघड नाही, हा ठेवणीतला चौकार बाळासाहेबांनी मारल्याने पालिका वर्तुळाच्या भुवया उंचावल्या.

सध्यातरी या राजकीय समीकरणाच्या गोष्टी शक्‍य नाही, मात्र आक्रमक शैलीच्या नावाखाली सैराटलेले बाळासाहेब खंदारे कालच्या सभेत मात्र शिस्तिच्या एका दोरीत चालत असल्याप्रमाणे वाटले. आधी तोंड बांधून घेणाऱ्या बाळासाहेबांनी पुन्हा मौन व्रत तोडत सभा सचिवांची चांगलीच हजेरी घेतली. त्यामुळे नगर विकास आघाडीला बऱ्याच महिन्यानंतर त्यांचा विस्फोटक फलंदाज गवसला आहे. बाळासाहेबांच्या कोणत्याही तडक-फडक आंदोलनावर साविआ पुन्हा राजकीय उतारा शोधणार त्यामुळे तुर्ततरी जाऊ द्या ना बाळासाहेब…! इतकेच म्हणावेसे वाटते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)